१३ प्रवासी जखमी : गतिरोधकामुळे अपघात
वारंवार अपघात होत असूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष
शिक्रापूर – पुणे येथून 45 प्रवासी घेऊन जाणारी एसटी शिक्रापूर येथे गतिरोधक जवळ आल्यानंतर समोरील कंटेनरने ब्रेक दाबल्याने एसटी कंटेनरवर जोरात आदळल्यामुळे 13 जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. 5) सकाळी ही घटना घडली. दरम्यान, येथे वारंवार अपघात होत असल्याने संबंधित खात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरीत आहेत.
दीपक नलगीरे (वय 22, लातूर), शोभा तायडे (वय 23, जामखेड), शीतल काळे (वय 16, पारनेर), सुरेखा देशपांडे (वय 48, कारेगाव), गजानन मुळे (वय 30), नामदेव मुळे (वय 52, दोघे रा. लिंबोणी), सुनंदा पवार (वय 50, रा. चिंचवड), रूपचंद गांगुर्डे (वय 49, रा. श्रीरामपूर), अशोक सरसंघकर (वय 70), विजया सरसंघकर (वय 66), नितीन सरसंघकर (वय 45, तिघे रा. पुणे), श्रीराम देशपांडे (वय 60, रा. बाभळसर), उद्धव तौर (वय 42, रा. उक्कडगाव), असे जखमी झालेल्या 13 प्रवाशांची नावे आहेत.
सर्व जखमींना शिक्रापूर येथील रक्षक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात चालक विकास लेंढाळ हे जखमी झाले आहे. याबाबत चालक विकास लेंढाळ (रा. गेवराई, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
मलठण फाटा येथील गतिरोधक जीवघेणा –
शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या मलठण फाटाजवळ साई सहारा पेट्रोलपंपासमोरील गतिरोधक जीवघेणा ठरत आहे. हा गतिरोधक हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांनी दुभाजक तोडून रस्ता मोकळा केला होता.
त्यांनतर गतिरोधक बसविण्यात आले. परंतु मोठा उतार असल्यामुळे येणारी वाहने वेगाने येतात. परंतु गतिरोधक दर्शविणारा फलक नसल्यामुळे वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येत नसल्यामुळे दुभाजक दिसताच वाहने थांबवावी लागत आहे. वेगाने येणारी वाहने ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी इतर वाहने पुढे थांबलेल्या इतर वाहनांवर आदळत असून अनेक अपघात होत आहेत.
शिक्रापूर येथील गतिरोधकामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. या ठिकाणचा गतीरोधक तातडीने काढून टाकण्यात येईल.
– नवनाथ शेळके, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग