मनपाकडून प्लास्टिक बंदीची मोहीम जोरात
नगर – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेची धुरा हाती घेतातच शहरात बंदी असतांनाही खुले आम प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपाकडून पथक तयार करून कठोर अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, गुरुवारी (दि.5) दिवसभरात तब्बल एक लाखापर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे.
स्वच्छता सर्वेक्षणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी (दि.4) बैठक घेतली. यात प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करुन, स्वच्छता निरीक्षकांना कारवाई सुरू करण्याचे आदेश देवून, प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाला उद्दिष्टही देण्यात आले आहे.
त्यानुसार उपायुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, के. के. देशमुख, आर. एल. सारसर, पी. एस. बीडकर, ए. व्ही. हंस, एस. ई. वाघ, बाळासाहेब विधाते, टी. एन. भांगरे आदींनी शहरात ठिक ठिकाणी छापे टाकून, दिवसभरात प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर धडक कारवाई केली. त्यात 91 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.