नगर – घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत (एलपीजी) सलग पाचव्या महिन्यात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनदरांचा आढावा घेऊन सरकारी इंधन कंपन्यांतर्फे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या सिलिंडरची सुधारित किंमत जाहीर करण्यात येते. डॉलर व रुपया यातील विनिमय दराचाही या किमतीवर परिणाम होतो. या सिलिंडरच्या दरवाढीचा हा सलग पाचवा महिना ठरला आहे.
गेल्या पाच महिन्यापासून घरगुती वापराच्या सिलेंडरची दरवाढ सुरू आहे. गेल्या महिन्यात सिलेंडर दर 726. 50 रुपये होते. आता डिसेंबरमध्ये त्यात आणखी वाढ होऊन ते 741 रुपयांवर पोहोचले. त्यामुळे महिनाभरातच 14. 50 रुपये इतकी दरवाढ झाली. गेल्या ऑगस्ट पासून ते डिसेंबर पर्यंत तब्बल 120 रुपयांनी दरवाढ झालेली दिसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले दिसतात. घरगुती सिलेंडर दर कमी घेण्याचे नाव घेत नाही. ऑगस्टमध्ये 14.2 किलो वजनाचे सिलेंडरचे दर तब्बल 105 रुपयांनी वाढवण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 50 रुपयांनी वाढवण्यात आला तर ऑक्टोबरमध्ये 76.50 रुपयांनी वाढले.
मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी सिलेंडर 76 रुपयांनी महागले होते. डिसेंबरमध्ये दरवाढीला ब्रेक लागेल अशी सर्वसामान्यांना असताना या महिन्यातही सिलिंडरचे दर 14 . 50 रुपयांनी वाढले.
सध्या विनाअनुदानित सिलेंडरचा दर 741 रुपये झाला आहे. गेल्या महिन्यात हाच दर 726.50 रुपये एवढा होता. सातत्याने सिलेंडरची दरवाढ होत असल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. ही दरवाढ पाहता सर्वसामान्यांना आता सिलेंडर परवडेनाशी झाली.