डिलरकडून वाहन घेतानाच “फास्टॅग’ मिळणार
पुणे – “फास्टॅग’मुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि वेगात होणार आहे. याचे अनेक फायदे असल्यामुळे ही व्यवस्था लोकप्रिय करण्यासाठी वाहन उत्पादकांची संघटना प्रयत्न करत आहे.
“सियाम’ या वाहन उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले, “आम्ही महामार्ग विभागाबरोबर गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर काम करत आहोत. प्रवासी किंवा मालवाहतूक करणारे वाहन डीलरकडून विकले जात असतानाच त्यावर “फास्टॅग’ असावा, यासाठी आम्ही “फास्टॅग’ देणाऱ्या संस्थेबरोबर सहकार्याने काम करीत आहोत. हे काम दि.1 डिसेंबर 2017 पासून सुरू आहे.
आगामी काळामध्ये सर्वच डीलर नवी वाहने “फास्टॅग’सह देतील. मात्र, जुन्या वाहनांना “फास्टॅग’बाबत माहिती देण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून महामार्गावरील बहुतांश वाहने “फास्टॅग’च्या आधारावर जातील अशी आशा आहे.’
“फास्टॅग’चा उपयोग नेमका काय?
टोल देण्यासाठी मोठी रांग असते. त्यामुळे केवळ इंधन आणि वेळही वाया जातो. “फास्टॅग’मुळे देशभरातील वाहनांचा वेळ व इंधन वाचणार आहे. या प्रक्रियेला वेग येण्यासाठी ज्या वाहनाकडे “फास्टॅग’ नसेल, त्यांना केवळ एक लेन राखीव ठेवण्यात येणार आहे आणि इतर लेनमधून एखादे “फास्टॅग’विरहित वाहन गेल्यास त्याला दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.