100 क्रमांकावर मदत मागितल्यास 7 मिनिटांत पोलीस येणार
पुणे – शहरातील महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वारंवार गुन्हे घडतात, अशा ठिकाणांची यादी करून त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पोलिसांकडून महापालिकेला देण्यात आल्या आहेत. अनेकदा अंधार असलेल्या ठिकाणाचा फायदा घेत गुन्हेगार गुन्हे करतात. त्यामुळे अंधार असलेल्या ठिकाणी दिवे लावावे, भुयारी मार्गात कर्मचारी नेमावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच पुण्यातदेखील पूर्वी महिला अत्याचाराच्या व खुनाच्या घटना घडल्या आहेत.
त्यावर वेळोवेळी उपायोजना करण्यात आल्या होत्या. नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी “बडीकॉप’ ही योजना पुण्यात सुरू करण्यात आली. त्यासाठी व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करण्यात आले. असुरक्षित वाटल्यानंतर महिला तत्काळ “बडीकॉप’ला मदत मागू शकते. सध्या देखील हे ग्रुप शहरातील कंपन्यात सुरू आहेत. तसेच, महिला सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
शहरातील अंधार असलेली आणि निर्मनुष्य ठिकाणी उपाययोजना करण्याबाबत महापालिकेला कळवण्यात आले आहे. वेळोवेळी त्यांच्याशी समन्वय ठेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांचा 100 क्रमांकावर मदत मागितल्यास सात मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचून मदत करतात. हा वेळ यापेक्षाही अधिक कमी करण्यावर भर दिला जात आहे. नागरिक व महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य असेल.
– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे.