उपनगरांतील भाजपचे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा
पुणे – महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांनाच झुकते माप दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नगरसेविका मुक्ता टिळक यांना महापौर पदाची संधी दिली गेली. नगरसेवक महेश लडकत यांना शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, तर अजय खेडेकर यांना उपाध्यक्षपद दिले गेले होते. नवीन कार्यकारिणी आल्यानंतर पहिल्यांदाच निवडून आलेल्या ऍड. गायत्री खडके यांना विधी समितीच्या अध्यक्षपदाची संधी दिली गेली, तर त्यानंतर योगेश समेळ यांना ती मिळाली.
संग्राम थोरात हे देखील पहिल्यांदाच सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांनाही क्रीडा समितीचे, तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या राजेश येनपुरे यांना देखील नाव समितीचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर आता सभागृह नेते पद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद कसब्यातीलच नगरसेवकांना मिळाल्याने इतर नगरसेवकांची पदाची अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नसल्याने अन्य ठिकाणचे नगरसेवक नाराज आहेत.
शहराच्या मध्यभागातील नगरसेवकांनाच पदे मिळाल्याने उपनगरांतील भाजपचे नगरसेवक नाराज झाले आहेत. तर खासदार संजय काकडे यांच्या गटातील नगरसेवकांनाही संधी मिळाली नाही. त्यांच्यापैकी एकाला पीएमपीच्या संचालक पदावर संधी दिली जाण्याची शक्यता असून, या पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पीएमपीएमएलच्या पदावरूनच भाजपच्या बैठकीत काही वाद झाल्याने या पदाचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला नाही, तो प्रलंबित ठेवण्यात आला. मुख्यसभेतच अचानक या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.