सहा महिन्यांनंतरही दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच
वडगाव मावळ – लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. निवडणुकीच्या बूथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांनाही भत्ता मिळालेला नाही. लोकसभा निवडणूक संपून आता सहा महिन्याचा काळ संपला तरी मावळ येथील 200 अधिकारी व कर्मचारी अद्याप निवडणुकीमधील भत्त्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची कामे कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जातात. निवडणूक कशी हाताळावी, मशीन कशी ऑपरेट करावी यांसह उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब ठेवणे यांसारख्या कामासाठी आजूबाजूच्या सरकारी आणि निमसरकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांना जुंपले जाते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मावळ तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपण्यात आले होते. काळ-वेळेच्या मर्यादा न पाळता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा उत्सव संपन्न करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना अद्यापही भत्ता देण्यात आला नाही.
मावळ लोकसभा निवडणुकीचे मतदान 29 मे 2019 रोजी झाले. या निवडणूक काळात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, विविध पथकात नेमण्यात आले होते. नेमणूक झाल्यानंतर या कामासाठी कर्मचाऱ्यांना स्वतंत्र भत्ता देण्यात येतो. मात्र, निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ संपला तरी अद्याप कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला अद्याप त्यांना मिळाला नाही. मागील सहा महिन्यांपासून हे अधिकारी व कर्मचारी वारंवार मावळ तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक विभागात आपला भत्ता कधी मिळणार? याची चौकशी करत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही यातील बहुतांश कर्मचाऱ्याची पुन्हा निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचाच भत्ता अद्याप मिळालेला नाही तेव्हा विधानसभा निवडणुकीचा केव्हा मिळणार? अशी चिंता या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात बिले जमा
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भत्ता बिले जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहेत. बिलाचा निधी उपलब्ध झाल्यावर त्वरित वाटप करण्यात येईल. अशी माहीती निवडणूक नायब तहसीलदार आर. एल. कांबळे यांनी दिली आहे.