तीन दिवसांत तिघे जखमी : अनेक प्राण्यांचा पाडला फडशा
मंचर (प्रतिनिधी) – नारोडी (ता. आंबेगाव) परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये गेल्या तीन दिवसांत विवेक एरंडे, अतीश शेवाळे, गोरक्ष हुले जखमी झालेले आहेत. शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता हुले स्थळनंबर 2 येथून डेअरीमध्ये दूध घेऊन जात असताना वृत्तपत्र व्यवसायिक नवनाथ पिंगळे यांच्या पत्नी सविता पिंगळे यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला पळुन लावले. दरम्यान, अफवापसरू नये म्हणून वनविभागाकडून दिवस रात्र जनजागृती करण्यात येत आहे.
नारोडी परिसरात बिबट्याच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत 20 ते 25 कुत्री, 5 ते 6 शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. परिसरात तीन ते चार बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर शेतात काम करण्यासाठी तयार होत नाहीत. बिबट्याबरोबर दोन बछडे असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे, त्यामुळे वनविभागाला बिबट्याला जेरबंद करणे अवघड झाले आहे. नारोडी येथील गोरक्ष हुले हे दुचाकीवरुन मंचरला जात असताना गावमळा येथे आले असता रस्त्यावरुन बिबट्याचे दोन बछडे चालत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला, आणि रस्त्याच्या कडेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता शेजारील शेतात दबा धरुन बिबट्याच्या मादीने मागील बाजूने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये छाती आणि मानेला जखम झाली.
हुले यांनी प्रसंगावधान राखत एका हाताने दुचाकी सांभाळत बिबट्याला डाव्या हाताने जोरदार झटका दिला; परंतु त्याने पुन्हा एकदा त्यांच्या डाव्या पायाला पंजा मारुन जखमी केले. हुले यांनी दुचाकीचा वेग वाढवत धूम ठोकली. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घोडेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनरक्षक आर. आर. मोमीन, वनपाल ए. व्ही. साबळे यांनी भेट घेऊन त्यांची विचारणा केली.
नारोडी, चास, चांडोली, मंचर येथे वनविभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. विनाकारण अफवा पसरवू नये. तसेच भीतीचे वातावरण तयार होईल, असे कृत्य कोणीही करू नये. नारोडी येथे बिबट्या जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहे. जखमी व्यक्तींना पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी जाण्याची गरज नाही. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात आली आहे.
– योगेश महाजन, अधिकारी घोडेगाव वनपरिक्षेत्र
.. म्हणून बिबट्या करतो हल्ला
नारोडी परिसरामध्ये घोडनदीच्या शेजारील भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. या शेतामध्ये बिबट्याचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. उसाचे क्षेत्र आणि बागायती क्षेत्र मोठ्याप्रमाणात असल्यामुळे नारोडी परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणावर वस्ती असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याचे बछडे रस्त्यावरुन फिरत असतात आणि मादी शेजारील शेतातून त्याच्यावर लक्ष ठेवून असते. तेथे एखादा दुचाकीस्वार जात असताना बछड्यांना धोका होईल. या भीतीने मादी दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी इनामगाव येथे सांजवेळी थरार
मांडवगण फराटा (वार्ताहर) – इनामगाव (ता. शिरुर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला हिराबाई बबन खळदकर (वय 70, रा. वाळुंजपट इनामगांव) या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्यानंतर बिबट्या पुन्हा त्याच घरात शिरला. त्यामुळे शेजारील नागरिकांनी सायंकाळपर्यंत गर्दी केलेली होती. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी घडली.
इनामगाव येथील वाळुंज पट भागात अंगणात लहान मुले खेळत होती. इतक्यात कुत्र्याला बिबट्याची चाहूल लागली. बिबट्याला पाहताच अंगणातील लहान मुले घाबरून घरात पळाली. त्यावेळी बिबट्या हा अंगणात आला. हिराबाई खळदकर या नुकत्याच आतील खोलीतून बाहेर येत होत्या. त्यावेळी काही कळण्याच्या आत क्षणात बिबट्याने आजींवर हल्ला चढविला. यात खळदकर यांना डाव्या हाताला, अंगाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार घडत असताना शेजारील महिलांनी पाहिल्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी अतुल रावसाहेब मचाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला हुसकावून लावले. त्यानंतर त्यांना तातडीने मांडवगण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये हिराबाई खळदकर यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मनोज भोसले व डॉ. सुनील पवार यांनी सांगितले.