भोर पंचायत समिती : दमयंती जाधव यांची मागणी, पक्षश्रेष्ठींनी दिलेले आश्वासन पाळावे
भोर – भोर तालुका पंचायत समिती सभापदासाठी पक्ष श्रेष्ठींनी सभापती पदाच्या निवडी वेळी सव्वा-सव्वा वर्षांसाठी महिला आरक्षण असताना ठराव केला होता. मात्र, तो आमलात आणला गेला नाही. आता अडीच वर्षानंतर सभापती पदासाठीचे आरक्षण डिसेंबर महिन्यात सोडतीने जाहीर करण्यात येणार आहे. या वेळी मात्र आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर पक्ष श्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळून जसे ठरले त्याप्रमाणे सभापती पदी वर्णी लावावी, अशी मागणी भोर पंचायत समितीच्या सदस्या दमयंती जाधव यांनी केली आहे.
भोर तालुका पंचायत समितीच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दमयंती जाधव या कारी गणातून मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी त्यावेळी आरक्षीत होते.ज्या महिला निवडून येतील त्यांना सव्वा-सव्वा वर्ष सभापती पदाची संधी दिली जाईल, असा निर्णय राष्ट्रवादी पक्षातर्फे घेण्यात आला होता. त्यावेळी मंगल बोडके यांना पहिल्यांदा संधी देण्यात आली. मात्र, सव्वा वर्षानंतर त्यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाचे पालन न करता पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने दमयंती जाधव यांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली.
पुणे येथे खासदार सुप्रीया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मा.ता.अध्यक्ष चंद्रकांत बाठे, जि.प.सदस्य रणजित शिवतरे, सभापती मंगल बोडके, दमयंती जाधव आदींची बैठक जुलै महिन्यात झाली असून या बैठकीत सभापती पदासाठी आरक्षण काहीही निघाले तरी जाधव यांनाच हे पद दिले जाईल, असे ठरले आहे. त्यानुसार जाधव यांनी भोर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदावर दावा केला आहे.
उपसभापतीप्रमाणे निर्णय व्हावा….
भोर तालुका पंचायत समितीत राष्ट्रवादीचे 4, कॉंग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी 1 सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षाच्या काळात मंगल बोडके यांनी अडीच वर्ष सभापती पद तर सव्वा-सव्वा वर्षासाठी उपसभापती म्हणुन लहूनाना शेलार व श्रीधर किंद्रे यांना संधी मिळाली आहे. उपसभापती पदाबाबतचा निर्णय अमलात आणला जातो तर मग सभापतीपदाचा का नाही? असा सवाल करीत सभापदाची संधी या वेळी मला मिळावी, अशी अशी मागणी दमयंती जाधव यांनी केली आहे.