कराड – आगाशिवनगर, मलकापूर येथील दांगटवस्तीतील विकास लाखे याच्यावर बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली होती. या घटनेला सहा दिवस होऊन गेले तरी विकासच्या मारेकऱ्यांना अजून अटक झाली नसल्याने अखिल महाराष्ट्र कोल्हाटी, डोंबारी समाज संघटनेने विकास लाखेच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आगाशिवनगर, ता. कराड येथे 6 नोव्हेंबर रोजी रात्री विकास लाखेवर गोळ्या झाडल्या. बारा गोळ्या लागल्याने विकास जागीच ठार झाला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पलायन केले. विकास लाखे हा भटक्या जमातीतील कोल्हाटी डोंबारी समाजातील उपेक्षित समाजापैकी आहे. त्याच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे. तो कुटुंब चालविण्यासाठी मिळेल ते काम करीत होता. त्याच्यावर ज्या पद्धतीने गोळीबार करण्यात आला. त्या धास्तीने त्याचे कुटुंबीय त्यातून सावरले नाही. ज्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्या अज्ञात हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी करावी.
विकी लाखेवर झालेल्या हल्ल्याचा अखिल महाराष्ट्र कोल्हाटी, डोंबारी समाज संघटना निषेध करीत आहे. या घटनेने महाराष्ट्रातील कोल्हाटी, डोंबारी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संताप व चिड निर्माण झाली आहे. मृत विकी लाखे व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर वसंतराव मोहोरकर, रमेश विठ्ठल मोरे, रवि बबन मोरे, सुरेश मोरे, यशवंत जावळे, चंद्रकांत लाखे यांच्यासह अखिल महाराष्ट्र कोल्हाटी, डोंबारी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.