जामखेड – जामखेड नगर रोडवरील कोठारी पेट्रोल पंपासमोर बसने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालकाविरुध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मोहन वनवे (वय 29, रा. पोखरी, ता. आष्टी, जि. बीड) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जामखेड- नगर रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले असुन गेल्या पंधरा दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे.
शनिवारी (दि.9) रात्री 10.30 च्या सुमारास मोटारसायकलस्वार कोठारी पेट्रोल पंपासमोरून नगर रोडने पोखरीकडे जात असताना नगरहून जामखेडकडे जात असलेल्या बसने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील संजय वनवे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी यांनी घटनास्थळी धाव घेत वनवे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी फिर्यादी सुरेश गोविंदराव वनवे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक बाजीराव रामकिसन सातपुते (रा. पाटोदा, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब गव्हाणे करत आहेत.