गणेश घाडगे
नेवासा – नेवासा तालुक्यात नुकताच एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. सध्या तालुक्यात बदलत्या हवामानामुळे थंडी-तापेची साथ पसरली आहे. मात्र तालुक्यात आरोग्य विभागात तब्बल 25 पदे रिक्त आहेत. तसेच अनेक उपकेंद्रांचा कारभार आरोग्य सेवकांविनाच चालत असल्याने जनतेचे आरोग्य रामभरोसे असल्याचे दिसून येते.
अनेक उपकेंद्रांत कर्मचारी कमी असल्याने आरोग्य विभागातील एकाच अधिकारी व कर्मचाऱ्यास दोन-दोन गावांचा कारभार पहावा लागत आहे.
त्यामुळे आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. एकीकडे शासन गरिबांना आरोग्य सेवा मोफतचा नारा देत आहे. मात्र दुसरीकडे आरोग्य सुविधा वेळेत मिळावी, ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे जनतेतून सांगितले जात आहे. वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जनतेला खासगी दवाखान्यांत जास्तीचे पैसे देत उपचार घ्यावे लागत आहेत.
सध्या तालुक्यात सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने खासगी रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सहायक (महिला) आरोग्य सेवक (महिला), अशी एकूण 142 मंजूर पदे आहेत. त्यापैकी सोनई, नेवासा खुर्द येथे दोन आरोग्य सहायक (पुरुष), पाचेगाव, अमळनेर, चिलेखनवाडी, माका मक्तापूर, शिंगणपूर, सलाबतपूर, वरखेड तरवडी येथे पाच आरोग्य सेवक (पुरुष), चांदा येथे आरोग्य सहायक (महिला) एक, जा. आखाडा, बेलपिंपळगाव, उस्थळ दुमाला, सोनई, सलाबतपूर, गेवराई शिरसगाव, टोका, भानसहिवारा, चांदा, फकीरवाडी, देडगाव उपकेंद्रांत 13 आरोग्य सेवक (महिला) ही पदे रिक्त आहेत.
त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पदे रिक्त असूनही आरोग्य उपकेंद्रांचा कारभार चालतोच कसा, असा प्रश्न सध्या तालुक्यात उपस्थित होत आहे. रिक्त कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरण्याची मागणी होत आहे. वेळोवेळी मागणी करूनही मागील अनेक दिवसांपासून ही पदे रिक्त आहेत. दरवर्षीच पावसाळ्यात तालुक्यात साथीचे आजार पसरतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.