आमदार अशोक पवार : शिरूर शहरातील प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही
शिरूर – शिरूर-हवेली तालुक्यातील महत्त्वाचे असणारे शिरूर शहरातील टपरीधारकांचा प्रश्न, पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, कचरा डेपो निर्मूलन, शिरूर शहरातील रस्त्याचा प्रश्न, हुडको घरे नावावर करणे, शिरूर शहरासाठी साठवण तलाव निर्माण करणे या प्रश्नांवर गांभीर्याने काम करणार असल्याचे आश्वासन शिरूर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ऍड अशोक पवार यांनी देऊन शिरूर-हवेली तालुक्यात “विकास एके विकास’ एवढेच काम करणार असल्याचे शिरूर शहरातील सत्काराला उत्तर देताना सांगितले.
शिरूर-हवेली तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांचा शिरूर शहराच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक प्रकाश धारिवाल होते. यावेळी शिरूरच्या नगराध्यक्ष वैशाली वाखारे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष नसीम खान, रवींद्र ढोबळे, सचिन धाडीवाल, अभिजीत पाचर्णे, माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण, जैन समाजाचे अध्यक्ष शांतीलाल कोठारी, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तु. म. परदेशी, प्रभाकर डेरे, पांडुरंग थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, संतोष भंडारी, माजी नगरसेवक चंद्रकांत बोरा, हाफिज बागवान, वसंत गादिया, कामिनी बाफना, संगीता शेवाळे, नयना राक्षे, तज्ञिका कर्डिले, नगरसेविका सुरेखा शितोळे, उज्वल वारे, ज्योती लोखंडे, रोहिणी बनकर, कलीम सय्यद, अमोल चव्हाण, रवींद्र खांडरे, शिरीष लोळगे, दिनकर पाडळे, राजू लोळगे यांसह शहरातील विविध संघटनांचे कार्यकर्ते अध्यक्ष व नागरिक उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, शिरूर शहर व पंचक्रोशीने यंदाची निवडणूक हातात घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते दुसऱ्या पक्षात गेले तरी येथील नागरिक मतदार बंधू भगिनी माझ्या बरोबर होते. त्यामुळे शिरूर शहर व पंचक्रोशीतून मला मताधिक्य मिळाले, त्याबद्दल शिरूर व पंचक्रोशीतील जनतेचा मी शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहील. तर या भागातील झोपडपट्टी धारकांचा घरकुलाचा प्रश्नही मुंबईप्रमाणे सोडवणार असल्याचे त्यांनी सांगून लवकरच टपरी धारकांना टपऱ्यांऐवजी चांगला गाळा मिळणार आहे.
उद्योजक प्रकाश धारिवाल म्हणाले, शिरूर शहराचा कायापालट व मोठ्या प्रमाणात विकासकामे आणणारा पहिला आमदार म्हणून नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांचे नाव घेतले जात आहे. या भागामध्ये चांगले रस्ते, चांगल्या आरोग्य सोयी, चांगले प्रशासन कार्यालय व गोरगरिबांना मोठ्या हॉस्पिटलमधून बिल माफ करून समाजकार्याचा एक नवा पायंडा त्यांनी पाडला आहे.
यावेळी शिरूर शहरातील विविध संघटना व्यापारी संघटना गणेश मंडळी यांनी शाल पुष्पगुच्छ हार पुणेरी पगडी, ज्योतिराव फुले पगडी टोपी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हाफिज बागवान, स्वागत मुजफ्फर कुरेशी, तर रवींद्र ढोबळे यांनी आभार मानले. करडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील इसवे यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
दुसऱ्यांची मदत, आपलेच फुटीरवादी –
विधानसभा निवडणुकीमध्ये मला शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांसह दुसऱ्या विरोधी पक्षातील काही लोकांनी मदत केली असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले या भागातील काही नेते दिवसा वळसे पाटलांच्या गाडीत फिरत होते. रात्री या भागातील विरोधी उमेदवाराच्या बंगल्यात जाऊन माझ्या विरोधी काम करत होते. ज्यांना मी दहा वर्षे मदत केली असे हे कार्यकर्ते होते. त्याबद्दल ही त्यांनी यावेळी खंत व्यक्त करून दाखविली.