गणेश घाडगे
नेवासा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खास निमंत्रणाखातर माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. ठाकरे-गडाख यांची भेट शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्तास्थापनेची नांदी ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
ज्येष्ठ नेते गडाख यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेले घरगुती संबंध राजकीय फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे राज्याची सत्ता भाजपला डावलून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी ठाकरे-गडाख यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीने मात्र तालुक्यात अपक्ष म्हणून आमदार झालेले शंकरराव गडाख यांना राज्य किंवा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी उपलब्ध झाली असल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. गडाख कुटुंबाला मंत्रिपदासाठी अनेक राजकीय नेत्यांनी विरोध केला होता. मंत्रिपदासाठी गडाख यांनी नेत्यांशी राजकीय संघर्ष केला होता. मात्र त्यांना अनेक दिवसापासून मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. मात्र आता शिवसेनेच्या माध्यमातून गडाख यांना मंत्री होण्याची संधी उपलब्ध झाली असून, यशवंतराव गडाख यांच्या राजकीय अपेक्षा पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाची लाट असताना देखील आपली व्यक्तिगत यंत्रणा वापरत अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवून राज्याची सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. मात्र शिवसेनेला देखील गडाख यांच्या रूपाने कारखानदार आमदार मिळत असल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार असून, पुढील राजकीयदृष्ट्या शिवसेनेला गडाख यांच्या रूपाने जिल्ह्यात मोठा आधार मिळणार आहे.
गडाख यांच्या रूपाने जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेला कारखानदार आमदार मिळाला असल्याने तालुक्यासाह जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गडाख यांची तालुक्यातील पंचायत समितीवर एकहाती सत्ता असून, सात जिल्हा परिषद गटांपैकी सहा जिल्हा परिषद गटात गडाख यांचीच ताकद असल्याने भविष्यातील निवडणुकीत शिवसेनेचाच झेंडा फडकणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे तालुक्यात शिवसेना सत्ताधारी म्हणून पहिल्यांदा सहभागी होणार आहे.