शेवगाव – गावात मोठ्या प्रमाणात सर्रास होत असलेली अवैध दारू व मावा विक्री तातडीने बंद करावी, अन्यथा आगामी सात दिवसात या गावातील सर्व महिला व पुरुष ग्रामस्थ शेवगावात येऊन रस्तारोको करतील, असा इशारा तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक, आव्हाणे खुर्द व बऱ्हाणपूर या तीन ग्रामपंचायतीतील पाच गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व आव्हाणे बुद्रूकचे सरपंच संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक, तहसीलदार तसेच शासनाला देण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांचे समवेत बऱ्हाणपूरचे सरपंच सुभाष वाणी, आव्हाने खुर्दचे सरपंच कोंडीराम आहेर, किशोर वाणी, वसंत देवा भालेराव, मोहनराव कोळगे, सुधाकर चोथे, अनिल खैरे, अशोक शिंदे, कांता मुटकुळे, समीर दिवटे, रामदास चव्हाण, साईनाथ झाडे, राजेंद्र नांगरे, गणपत खैरे, रवींद्र चव्हाण, अमोल मोकळ, असलम पठाण, अरुण मुटकुळे, अनिल चितळे, दया मुटकुळे, अमित आहेर, शहाजी कमानदार आदीसह सव्वाशे ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात गेल्या चार पाच वर्षापासून या गावांच्या परिसरात बेकायदेशीर दारू व मावा विक्री मोठ्या प्रमाणात चालू असून त्याचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे.गावातील शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असतात. परिसरातील विद्यार्थी, महिलांना त्याचा त्रास होतो. विद्यार्थ्यांच्या बालमनावर त्याचे नको ते परिणाम होतात. गावातील सार्वजनिक शांतता यामुळे धोक्यात आली आहे.
तरुण पिढी व्यसनाच्या आधीन होत असल्याने व्यसनपूर्तीसाठी ती वेगवेगळ्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करताना आढळतात. हे सर्व थांबावे म्हणून या गावच्या ग्रामपंचायतींनी आज घेण्यात आलेल्या विशेष ग्रामपंचायत बैठकीमध्ये दारू व मावा विक्री बंद करण्याबाबत एकमताने ठराव पारित केले आहेत. त्या ठरावाच्या प्रतीही निवेदनासोबत जोडण्यात आल्या असून सात दिवसात ठोस कारवाई न झाल्यास शेवगावात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.