अकोले – अकोले तालुक्यातील खरीप पीकपंचनाम्याची अजित पवार यांच्याकडून मुख्य सचिवांना सूचना दिली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळनेतेपदी पवार यांची निवड झाल्याबद्दल गुरवारी सकाळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सत्कार केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळनेतेपदी निवड झाल्याबद्दल आ. डॉ. लहामटे यांनी पवार यांचा त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सत्कार केला. तेव्हा अकोले तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित पिकांच्या संदर्भात आ. लहामटे यांनी त्यांना माहिती दिली.
ही गंभीरबाब लक्षात घेऊन आ. लहामटे यांच्या सूचनेनुसार अजित पवार यांनी मुख्य सचिव अजेय मेहताना दूरध्वनीवरून अकोले तालुक्याचा पिकांच्या पंचनाम्याच्या संदर्भात तातडीने पावले उचलावीत अशी सूचना केली. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, निलेश गवांदे ,पोपट चौधरी आदींनी पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतली. औपचारिक भेटीमध्ये तालुक्याचा वृत्तांत आ. लहामटे यांनी अजित पवार यांना दिला.
परतीच्या पावसामुळे 100 टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, तूर, कांदा डाळिंब व फूल शेती मध्ये झेंडू, गुलाब यांची सविस्तर माहिती आ. लहामटे यांनी दिली. तब्बल अर्धा तास पवार यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने बैठक भेट घेतली. पवार अतिशय “फ्रेश मूड’मध्ये होते. तेव्हा अकोले तालुक्यात गुलाल घेण्यास लवकरच येण्याचे त्यांनी यावेळी बोलताना कबूल केले. पवार यांनी विजयाबद्दल आ. लहामटे यांचे विशेष कौतुक केले आणि आठ दिवस गेल्यानंतर आपण स्वतःहून अकोल्याचा गुलाल घेण्याची सभाही निश्चित करू अशी हमी दिली.