राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचा प्रश्न
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. आता विधानसभा निवडणुकीची आचासंहिता संपल्याने सल्लागार नेमण्याचा तिढा सुटणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेची एक एकर जागा आहे. या जागेवर खूप जुनी कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या डागडुजीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेला आहे. दरवर्षी या खर्चात वाढच होत चाललेली आहे. अधिकारी, कर्मचारी यांना कामासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अनेक अडचणींचा सामना करत त्यांना कामे करावी लागतात हे उघड आहे.
परीक्षा परिषदेकडून 70 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध समित्यांमध्ये त्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. या कामासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यासाठी दोन वेळा ई-निविदाही मागविण्यात आल्या होत्या. सुरुवातीला फारशा सल्लागारांकडून निविदा दाखल झाल्या नाहीत. ज्या निविदा दाखल झाल्या त्या सर्व स्पर्धांमध्ये टिकल्याही नाहीत. यामुळे फेरनिविदा मागविण्यात आल्या. यात आठ जणांनी निविदा दाखल केल्या. या प्रत्येक निविदेतील कागदपत्रांची छाननी करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यातील तज्ञांमार्फतही निविदांमधील कागदपत्रांची छाननी करण्यात आलेली
आहे.
नियुक्तीबाबत निर्णय अद्यापही नाही
सल्लागारांच्या नियुक्तीबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्यानंतरच प्रत्यक्षात नवीन इमारतीचा आराखडा तयार करणे, बांधकामासाठी निविदा मागविणे ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.