…तोपर्यंत देशाची मोठी प्रगती अशक्‍य

पुणे – महाराष्ट्र आणि प्रामुख्याने पुण्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तो वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी आपली आहे. शाळेनंतर इतिहासाचा अभ्यास बंद केला जातो. इतिहासातून राष्ट्रवाद आपल्यामध्ये जागृत होतो. जोपर्यंत प्रखर राष्ट्रवाद आपल्यामध्ये जागृत होत नाही, तोपर्यंत भारत देश मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकणार नाही, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले. किल्ले प्रदर्शनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

इतिहास प्रेमी मंडळातर्फे नवीन मराठी शाळेत “गड आला पण सिंह गेला-नरवीर तानाजी मालुसरे’ यांची शौर्यगाथा या “लाईट ऍन्ड साऊंड शो’चे आयोजन करण्यात आले होते. तर किल्ले प्रदर्शनाचे उद्‌घाटन पाटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅप्टन (निवृत्त) नीळकंठ केसरी, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, जयंत गोखले, युवा कलाकार चिन्मय पटवर्धन, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते.

तब्बल 40 फूट लांबीची भव्य प्रतिकृती, हजारो दिवे आणि अभ्यासपूर्ण निवेदनातून जगप्रसिद्ध सिंहगडाच्या लढाईचा रणसंग्राम उलगडण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारलेला हा युद्धपट पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. हे प्रदर्शन दिनांक दि.3 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 4 ते 10 या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेण्याच्या पराक्रमाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत, असे शेटे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.