मतदानाच्या दिवशी झाला होता राजकीय राडा
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मतदानाच्या दिवशी पिंपरी येथे तुफान राडा झाला होता. याप्रकरणी माजी उपमहापौरांसह पाच जणांना अटक केली होती. रविवारी त्यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा वाढ केली. यामुळे त्या पाचही जणांची दिवाळी पोलीस कोठडीत जाणार आहे.
हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी (वय 51, रा. पिंपरी) प्रशांत बाबू मंदू (वय 34) अशी अटक केलेल्या “राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. शिवसेनेच्या बबलू सोनकर (वय 40), जितू मंगतानी (वय 32), लच्छू बुलाणी (वय 55, सर्व रा. पिंपरी) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी परस्परांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
मतदानाच्या दिवशी सोमवारी (दि.21) राजकीय वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले. त्यानंतर पोलिसांनी या पाच जणांना अटक केली. या सर्व आरोपींना मंगळवारी (दि. 22) न्यायालयासमोर हजर केले होते. त्या वेळी न्यायालयाने त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. इतर आरोपींनाही अटक करायची असल्याचे कारण पोलिसांनी रविवारी न्यायालयात दिल्याने पाचही आरोपींच्या कोठडीत वाढ केल्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर बाबर यांनी सांगितले.
बबलू सोनकर यांचे सासरे गौतम चाबुकस्वार पिंपरी मतदार संघात शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली. मतदानाच्या दिवशी सोनकर व त्यांचे कार्यकर्ते पिंपरी परिसरात फिरत असताना आसवानी यांच्या घराजवळून जात होते. त्या वेळी आसवानी व त्यांच्या साथीदारांनी कार्यकर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभरव आणि सोनकर यांना रस्त्यात अडवून लाकडी बांबू, सिमेंट गट्टू यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्याचप्रमाणे आसवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनकर, त्यांचे कार्यकर्ते आणि तीन बॉडीगार्ड आसवानी यांच्या घराजवळ आले. त्यांनी आसवानी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल त्यांच्या डोक्याला लावली. त्यांच्या साथीदाराने आसवानी यांच्या कार्यकर्त्यांवर पिस्तूल रोखल्याचे म्हटले होते.