प्रा. राम शिंदे की रोहित पवार, आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार
जामखेड – अत्यंत अटीतटीची लढत झालेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात कोण जिंकणार?याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तिसऱ्यांदा रिंगणात असलेल्या प्रा. राम शिंदेंना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या माध्यमातून नवा चेहरा मतदारसंघाचे नेतृत्व करणार. याविषयी सगळीकडे उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
मतदान यंत्रांची जुळवाजूळव, वेळेत काम करण्यासाठीची धावपळ, यावर मात करून प्रशासनाने निवडणुकीची लगीनघाई पार पाडली. आता मतदारांना निकालाचे वेध लागले आहेत. प्रशासन आता मतमोजणीची तयारी करण्यात गुंतले आहे. स्ट्रॉंगरूमपर्यंत मतदान यंत्रे पोहोचवल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. मतदान झाल्यानंतर मतदानापासून स्ट्रॉंगरूमपर्यंत यंत्र पोहोचवण्यासाठी रात्री काही तासांचा कालावधी लागला. सर्व अधिकारी व कर्मचारी लोकशाहीचे हे काम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेत असल्याचे चित्र होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर तहसील कार्यालयातील निवडणूक व इतर विभागात नेहमीच्या तुलनेत वर्दळ कमी होती. आता निवडणूक निकालाला काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी ते तयारी करीत आहेत.
मतमोजणी कर्जत येथील तहसील कार्यालयाजवळील शासकीय गोडावूनबाहेर थ्री टायर सुरक्षा कवच, केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखीव बल तसेच स्ट्रॉंगरूमच्या आवाराबाहेर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अधिकारी स्ट्रॉंगरूमला प्रत्यक्ष भेट देतात व वरिष्ठ पोलिस अधिकारी दिवसातून दोन वेळा सुरक्षेचा आढावा घेतात. मतमोजणी सुरू असतांना विविध पक्षांचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्णय जाणून घेण्याचा उत्साह असतो.
मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी असते. त्यामुळे येथील मतमोजणी केंद्राबाहेर मतमोजणीची माहिती जाहीर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतरची स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. गुरूवारी मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात येणार असून 26 फेऱ्यांचे नियोजन आहे. प्रत्यक्ष मतमोजणी आठ वाजल्यापासून सुरू झाल्यापासून तीन ते चार तासांमध्ये निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
उमेदवारांची धाकधूक वाढली, निकालाकडे डोळे
आमदार प्रा. राम शिंदे (भाजप), रोहित पवार (राष्ट्रवादी), अरुण जाधव (वंचित बहुजन आघाडी), आप्पासाहेब पालवे (मनसे), शंकर भैलुमे (बसपा) सोमनाथ शिंदे, गोविंद आंबेडकर, सुमित पाटील, बजरंग सरडे, महारुद्र नागरगोजे, राम शिंदे, ज्ञानदेव सुपेकर या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, निकालामुळे धाकधूक वाढली आहे.