सातारा – साताऱ्यात मंगळवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी झाली. दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत असताना तरुणांसह तरुणींमध्ये खादीची कपडे खरेदी करण्याकडे वाढता कल असल्याचे पहावयास मिळत होते. विशेष म्हणजे खादीच्या लिनन कॉटनकिंग, केंब्रिज या ब्रॅंडच्या खादींला मागणी वाढली असल्याचेही दुकानदारांकडून सांगण्यात आले. पारंपारिक कुर्ते, जीन्ससह बेसकोट व प्रिंटेड रेडिमेडला खरेदीवर ग्राहकांचा जोर होता.
सध्या हातमागावर तयार होणाऱ्या मुलायम कपडे वापरण्याचा “ट्रेंड’ वाढत आहे. त्यालाही कारणही तसेच आहे. हातमागावरील कपड्यांमुळे लुक तसेच मुलायमपणा ग्राहकांना आकर्षित करत आहे. डेनिम व कॉटन ट्रेंड यामध्येसुध्दा प्लेन व प्रिंटेड पर्याय खरेदीदारांसाठी दुकानदारांकडून उपलब्ध करुन दिला जात आहे . “हॅन्डलूम सप्ताह’ साताऱ्यात जोर धरत असल्याने खादीच्या शर्टचे सेल जागोजागी दिसत आहेत. खादीचे कपडे वापरण्याकडे नागरिकांचा विशेष कल दिसतो आहे. यामध्ये खादीतला कुर्ता, लेडीज कुर्ता, ड्रेस मटेरियल, पुरूषासाठीचे रूमाल, लुंगी, लहान मुलींसाठी कॉटनमधील परकर पोलकं, मुलांसाठी धोती कुडता, हातमागावर विणलेल्या साड्या, कपड्यांचे तागे, धोतर, अगदी कापडी हॅण्डबॅगसुध्दा तयार केल्या जातात.
मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्येही हातमागावरच्या कापड्यांना मागणी आहे. हातमागाच्या कपडे विक्रीतले मोठे ब्रॅण्ड या वस्तू खाजगी कारागीरांकडून कमी किंमतीत विकत घेतात आणि दुप्पट नफा कमवतात. तसेच हातमागावरचे कपडे विकत घेऊन स्वत:च्या ब्रॅण्डची जाहिरात करणारेही आहेत. मात्र, याच्या खऱ्या कारागिरापर्यंत मेहनतीचा मोबदला पोहोचत नाही. आजही कॉटनच्या वस्तू वापरण्यामागे मुख्य कारण दिसते ते म्हणजे उन्हाळ्यात या कपड्यांमुळे थंड आणि थंडीत उबदारपणा जाणवतो. शिवाय शरीराला कोणताही दुष्परिणामही याने होत नाही. अशा बहुगणी कपड्यांना पूर्वीपेक्षाही मागणी वाढली आहे.
हातमाग दिनाच्यानिमित्ताने साताऱ्यातील खादीग्रामचे सुयोग घोरपडे यांनी दिलेली माहिती अशी की, खादीचा ट्रेंड नजाकत दार आहे, व्हाईट कॉटन खादीमध्येच बारा ते तेरा प्रकार आहेत. साताऱ्यात खण आळी व वेगवेगळ्या दालनामध्ये महिलांसाठी लाछा, ट्रेंडी कुर्ता, पारंपरिक सलवार कमीज, साड्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून सवलतीच्या योजनांमुळे महिला वर्गाची दिवाळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
रेडिमेड व पारंपरिक वस्त्रांना ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खादीचे कुर्ते, महिलांसाठी साडी, ड्रेस मटेरियल, टॉप यांना चांगली मागणी आहे. तर, लहान मुलींसाठीचे परकर पोलकं विशेष पसंतीला उतरले आहे. अवघ्या रुपयांपासून ते हजार किंमतीपर्यंतची प्रत्येक कापडी वस्तू ही हातमाग आणि चरख्यावर तयार झालेली आहे. आंध्र, मध्यप्रदेश, गुजरात अशा देशाच्या कानाकोपऱ्यातून हातमागावरच्या कपडयांची आयात आम्ही करतो. कार्पोरेट कंपन्यांमधील व्यक्तींबरोबरच आता सर्वसामान्यांमध्येही खादीची क्रेझ वाढली आहे.