एस.टी. प्रवाशांची दिवाळी गोड : यंदाची हंगामी दरवाढ टळली

पुणे – दरवर्षी दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) बससाठी हंगामी दरवाढ करण्यात येते. मात्र, यंदा प्रशासनाने दरवाढ केली नसल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

राज्यभरात 21 ते 31 ऑक्‍टोबरदरम्यान तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, त्यापूर्वीच प्रशासनाने जादा बसेसचे नियोजन करून आरक्षण सुरू केले आहे. या आरक्षणाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने 22 ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान सोडण्यात येणाऱ्या दिवाळी विशेष बसेसचे आगाऊ आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे, आता तिकीट दरवाढ करणे योग्य नसल्याचे, एस.टी. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे 28 ऑक्‍टोबरपर्यंत दरवाढीबाबत निर्णय होणार नाही.

परंतु, दरवाढ करायची असल्यास निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्यावी लागते. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने ती राबविणे अशक्‍य आहे.

एस.टी. महामंडळाच्या नियमानुसार सणा-सुदीच्या दिवसात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्‍के भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने दिला आहे. मात्र, प्रवाशांच्या खिशाला कात्री बसू नये, यासाठी मागील वर्षी 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान 10 टक्‍के भाडेवाढ केली होती. मात्र, यंदा हंगामी भाडेवाढ करणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.