ठिकठिकाणच्या कारवाईत 7 जणांना अटक
नवी दिल्ली/हैदराबाद/कोलकाता : देशभरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 3 कोटी 11 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी हे काश्मीरी आहेत.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात सुमारे 99 लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. यात दुबईहून येणाऱ्या दोन काश्मीरी नागरिकांची सीमाशुल्क विभागाने तपासणी केली असता त्यांच्याकडे 1 किलो 275 ग्रॅम सोने आढळून आले. याप्रकरणी अटकेनंतर त्यांची चौकशी केली असता यापूर्वी त्यांनी 2 किलो 407 ग्रॅम सोन्याची तस्करी केली असल्याची कबुली दिली.
पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातून महसूल गुप्तचर संचालनालयाने 4 किलो 500 ग्रॅम तस्करी केलेले सोने जप्त केले असून दोन जणांना अटक केली. भारत-बांगलादेश सीमेजवळ बोनगावजवळ एका वाहनाची तपासणी केली असता सुमारे 1.85 कोटी रुपये किंमतीचे 4.5 किलो वजनाचे सोन्याचे बिस्किटे जप्त केले.
हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून सुमारे 28 लाख रुपये किंमतीचे 724 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. हा प्रवाशी मुंबईहून हैदराबादला आला असताना त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 724 ग्रॅम सोने आढळून आले.