दिवाळीच्या मुहुर्तावरील मोर्च्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता
लंडन : येत्या रविवारी दिवाळीच्या दिवशी काश्मीर प्रश्नावर नियोजित भारतविरोधी मोर्चाचा लंडनचे महापौर सादिक खान यांनी विरोध दर्शवला आहे. या मोर्च्यामुळे लंडनमधील फूट आणखी तीव्र होईल, असे सांगत आयोजकांना हा निषेध मोर्चा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रस्तावित मोर्चासाठी मेट्रो पोलिसांकडे परवानगी मागवण्यात आली आहे. त्या परवानगीच्या अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार, अंदाज 5 ते 10 हजार निदर्शक डाऊनिंग स्ट्रीटजवळील रिचमंड टेरेस येथून आपला मोर्चा काढण्याची योजना आखली आहे. हा मोर्चा लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
लंडनमधील भारतीय वंशाच्या विधीमंडळ सदस्य नवीन शहा यांच्या पत्राला उत्तर देताना महापौर खान म्हणाले की, लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या आसपास दिवाळीच्या शुभ दिवशी निषेध मोर्चा काढण्याच्या योजनांचा मी पूर्णपणे निषेध करतो. जेव्हा लंडनच्या रहिवाशांनी एकत्र येण्याची गरज असेल, तेव्हाच हा मोर्चा केवळ मतभेद अधिक मजबूत करेल. म्हणूनच आयोजकांनी हा मोर्चा रद्द करावा, असे आवाहन आपण करत असल्याचे ते म्हणाले.
सामाजिक वातावरण बिघडण्याच्या शक्यतेने या मोर्च्याला परवानगी देण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंती आपण गृहसचिवांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाह यांनी आपल्या पत्राद्वारे 15 ऑगस्ट रोजी भारतीय दूतावासाबाहेर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काही गट, ब्रिटीश पाकिस्तानी आणि फुटीरतावादी गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराची आठवणही करून दिली आहे.