शिवाजीनगर – भर पावसात जोरदार शक्तिप्रदर्शन करत दुचाकी फेरी काढून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची सांगता करण्यात आली. यावेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शनिवारी सकाळी 9 वाजता ही प्रचार फेरी काढण्यात येणार होती. मात्र, जोरदार पावसामुळे साडेअकरा वाजेनंतर फेरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कार्यकर्ते सकाळपासूनच बहिरट यांच्यासाठी भर पावसात उभे होते, अखेर साडेअकरा वाजता खडकी येथील गाडीअड्डा येथून रॅलीस प्रारंभ झाला. त्यावेळीही पाऊस सुरूच होता. मात्र, कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नसल्याने उत्साहपूर्ण वातावरणात ही फेरी काढण्यात आली.
खडकी बाजार परिसर,बोपोडी गावठाण, भाऊ पाटील रस्ता, आंबेडकर चौक, ब्रेमेन चौक, औंध गाव, आंबेडकरनगर, नागर्स रोड, परिहार चौक, चिखलवाडी, खडकी रेल्वे स्टेशन, रेन्जहिल, मरीआई गेट चौक, मुळा रोड, बीईजी, जय जवाननगर, संगमवाडी, भोसलेवाडी, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट, जंगली महाराज रास्ता, शिवाजीनगर गावठाण, पुलाचीवाडी, गुडलक चौक, वडारवाडी, वेताळबाबा चौक, जनवाडी वसाहतमार्गे गोखलेनगर येथील शाळेजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, निलेश निकम, उदय महाले, श्रीकांत पाटील, राजेंद्र भुतडा, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सदस्या पूजा मनीष आनंद, नीता बहिरट, डॉ. प्रज्ञा बहिरट, बाळासाहेब चव्हाण, लतीफ शेख, यांच्यासह महा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.