तीन रिक्षांवर पोलिसांची कारवाई : सहा हजार रुपयांचा केला दंड
नगर – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी जाचक अटींवर मात करत वाहनांसाठी प्रचार परवाने मिळविले. मात्र, रिक्षा चालकाने चालू रिक्षामध्ये प्रचार केल्याने तोफखाना पोलिसांनी तीन रिक्षांवर प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे. या आर्थिक दंडामुळे रिक्षा चालकांनी प्रचार थांबविल्याने उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रचार रिक्षा वाहन चालकांना परवाना देतांना उपप्रादेशिक परिवहन मंडळ व निवडणुक अधिकारी यांना निवडणूक आयोगाने ठरवून दिल्या आहेत. या अटी शर्तीभंग केल्यास संबंधितावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्याहद्दीत प्रचार करणाऱ्या तीन रिक्षा वाहन चालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी, मनसे, एआयएमआयएम च्या उमेदवारांचा प्रचार करणारे हे वाहन होते.
उमेदवारांकडून प्रचार यंत्रणेसाठी जोरदार तयारी सुरु होती. मात्र, निवडणूक प्रशासनाकडून परवाने मिळविण्यात विलंब होत असल्याने शहरासह जिल्ह्यात प्रचार रिक्षा फिरेनेशा झाल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. आता परवाने मिळूनही प्रचार रिक्षा फिरेनेशा झाल्या आहेत.
प्रचार वाहन परवाना मिळविण्यासाठी वाहन मालकांना प्रतिज्ञापत्र लिहुन द्यावे लागले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे संमती पत्र, त्याच बरोबर उपप्रादेशीक परिवहन मंडळाचा परवाना, वाहन फिटनेस दाखला, इन्शुरंस, आरसी बुक, लायन्संस, तसेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच चालत्या वाहनातून प्रचार करता येणार नाही. अशा जाचक अटी परिवहन मंडळाला निवडणूक आयोगाने घालून दिल्या आहेत. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे.