कामेरी – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. तळबीड, ता. कराड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून पदयात्रेस सुरुवात झाली.
आजच्या दौऱ्यात त्यांनी तळबीड, बेलवडे हवली, तासवडे, हनुमानवाडी, शिवडे, भवानवाडी, वराडे, पार्ले, बनवडी, हजारमाची, वनवासमाची, सुर्ली या गावांमध्ये पदयात्रा व कोपरा सभा घेतल्या. कार्यकते व नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
मनोज घोरपडे म्हणाले, उंब्रज भागात पदयात्रा करत असताना नागरिकांनी या विभागातील समस्या व विद्यमान आमदारांच्या अकार्यक्षमतेचा पाढाच वाचला. येथे जनता परिवर्तन करण्यास उत्सुक आहे. या भागात गेल्या पाच वर्षांपासून मी कार्यरत असून अनेक छोटीमोठी कामे मार्गी लावली. जो विकास आमदारांनी करायला हवा होता, तो त्यांनी केला नाही. या भागातील रस्त्यांची अवस्था पाहिली की, आमदांराची निष्क्रियता समोर येते. ते जनतेला गृहीत धरत असून त्यांना मतदारसंघातील विकासाशी देणेघेणे नाही.
पाच वर्षे आमदाकीची खुर्ची अडवून ठेवायची आणि कारखान्याच्या जीवावर निवडणूक लढवायची, हा त्यांचा मुख्य हेतू आहे. कराड उत्तर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या असताना, त्या सोडविण्यासाठी किंवा नवीन योजना मार्गी लावण्यासाठीही त्यांनी प्रयत्न करणे सोडाच, पण तिकडे लक्षसुद्धा दिले नाही. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत कराड उत्तर मतदारसंघ विकासाच्या बाबतीत खूप मागे आहे.
आत्तापर्यंत लोकांसमोर ठोस पर्याय नव्हता; पण माझ्या माध्यमातून आज जनतेसमोर पर्याय उभा आहे. जनतेच्या ताकदीवरच मी आज या लढाईसाठी उभा आहे. ही लढाई घराणेशाही विरूद्ध सर्वसामान्य जनता अशी आहे. सर्व जण एकजुटीने घराणेशाहीचा पराभव करू या, असे आवाहन घोरपडे यांनी केले.
युवा वर्गात मनोजदादांची “क्रेझ’
मनोजदादांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांची युवा वर्गात क्रेझ असल्याचा प्रत्यय तासवडे येथे आला. तेथील कार्यकत्यांनी मनोजदादांच्या पदयात्रेसाठी स्वखर्चाने घोडा ठरवला आणि हलगी, तुतारीच्या निनादात मिरवणूक काढली. “एकच वादा, मनोजदादा’चा जयघोष करत युवा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.