श्रीरामपूर येथे ससाणे समर्थकांच्या मेळाव्यात दुसरा पर्याय देण्याचा निर्णय
श्रीरामपूर – माजी आ. स्व. जयंतराव ससाणे सर्मथकांच्या मेळाव्यात माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव, हेच लक्ष असल्याच्या संतप्त भावना वक्त्यांनी बोलून दाखवल्या. तसेच श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीबाबतचे सर्व अधिकार उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना एकमताने प्रदान करण्यात आले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ससाणे गटाची एकजूट दाखवून देऊन लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याची कार्यकर्त्यांची भावना दिसून आली. बैठक ज्येष्ठ नेते जी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी करण ससाणे म्हणाले, स्व. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षांपासून तुमच्या सर्वांच्या ताकदीवर संघटना काम करत आहे. संघटनेच्या सुखा-दुःखात आपण एकजुटीने निर्णय घेतो. त्याचे चांगले परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिले आहेत. श्रीरामपूर मतदारसंघ गेल्या काही वर्षांत सर्वच बाबतीत वंचित राहिला आहे.
तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळणे, हक्काचे पाणी आणि फळपीक विमा न मिळणे, यास आपल्या तालुक्यातील निष्क्रिय आमदारच जबाबदार आहेत. त्यामुळे शहरी भागातील विकासाचे प्रश्न असो, अथवा ग्रामीण भागातील शेतकरी हिताच्या प्रश्नांचे महत्त्व जाणणारा आमदार असला पाहिजे. जो विकासाचा रस्ता स्व. ससाणे यांनी दाखवला, त्याच विकासाच्या मार्गावर चालणार आमदार श्रीरामपूर तालुक्यात होणार हे आज तुमच्या मोठ्या उपस्थितीने स्पष्ट होते. उमेदवार निवडीबाबत लवकरच कोअर कमिटीची बैठक आयोजित करून आपल्या सर्वांच्या मताचा आदर करत निर्णय होईल, असे ससाणे यांनी सांगितले.
यावेळी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, डॉ. वंदनाताई मुरकुटे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, सुधीर नवले, संजय छल्लारे, सुनंदा जगधने, मुरली राऊत, रघुनाथ उघडे, बदडे, सुभाष तोरणे, नीलेश भालेराव यांच्यासह अनेकांनी आपले विचार वक्त केले.आभार नगरसेवक मुक्तार शाह यांनी मानले.
तीच एकजूट आणि तोच उत्साह
माजी आ. स्व. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात व संघटन एकत्रित ठेवण्यात उपनगराध्यक्ष ससाणे यांना यश आले आहे. आजच्या मेळाव्यातील गर्दीवरून ते लक्षातही येत होते.