संगमनेर – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने साहेबराव नवले यांना मैदानात उतरविण्याचे निश्चित केले आहे. त्यांना सेनेकडून आज उमेदवारी देण्यात आली असून, उद्या (दि.3) ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
संगमनेरमधून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवून मंत्री विखे यांना मोठा धक्का दिला आहे. आ. थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली. अखेरीस नवले व विक्रमसिंग खताळ अशी दोन नावे चर्चेत होती. आज सेनेकडून साहेबराव नवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नवले यांनी यापूर्वी जनता दलातर्फे थोरातांना आव्हान दिले होते. आता ते पुन्हा एकदा युतीकडून आव्हान देणार आहेत. थोरातांचे कट्टर विरोधक मंत्री विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून नवले यांचा परिचय आहे. दरम्यान, संगमनेरमधून थोरात यांच्या विरोधात भाजपकडून तगडा उमेदवार देऊ, असा दावा मंत्री विखे यांनी वांरवार केला होता. यादृष्टीने विखे यांनी संगमनेरमध्ये लक्ष घातले होते. थोरात यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे या मतदारसंघातील सामना कसा होणार, याविषयी उत्सुकता आहे.