पुणे – भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा अनुपम सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा 11 ते 15 डिसेंबर रोजी होणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे हा 5 दिवसीय सांगीतिक सोहळा संपन्न होईल, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक श्रीनिवास जोशी यांनी दिली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गेली अनेक वर्षे पुण्यात हा महोत्सव आयोजित केला जात आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.
अभिजात शास्रीय संगीताची परंपरा जगभरात पोहोचविणारे अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात आवर्जून सहभागी होतात. ज्येष्ठ कलाकारांबरोबरच नव्याने संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या कलाकारांना ऐकण्याची संधीदेखील रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळते.
त्यामुळेच वर्षभर पुणेकरांकडून आतुरतेने या महोत्सवाची वाट पाहिली जाते. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.