21 लाख टन साठा जाहीर; पण, चार लाख टनांनी कपात
पुणे – पुढील आठवड्यात दसरा आणि त्यानंतर दिवाळीनिमित्त साखरेला वाढणारी देशभरातून मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्याकरिता साखरेचा 21 लाख टन साठा जाहीर केला आहे. खुल्या बाजारात तो उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, सुमारे चार लाख टन साठा कमी उपलब्ध करून दिल्याने खुल्या बाजारातील साखरेचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.
सध्याचा नवरात्रौत्सव-दसरा आणि पाठोपाठ दिवाळी आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत साखरेची मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा साठा जाहीर केला आहे. मात्र, यंदा किमान 25 लाख टन साठा उपलब्ध करून देण्याची बाजारपेठतील व्यापाऱ्यांना अपेक्षा होती.
गेल्या महिन्यात हा साठा 19 लाख टन एवढा जाहीर करण्यात आला होता. किमान सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या साठ्यात भरीव वाढ करणे अपेक्षित असताना, गेल्या महिन्याच्या तुलनेत केवळ दोन लाख टनांची वाढ साखरेचे भाव तेजीत ठेवण्याकरिता कारणीभूत ठरण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
देशातील सर्वच साखर कारखान्यांकडून साखरेची निविदा खुली ठेवली जात असून, प्रति क्विंटलला सुमारे 3,200 रुपये भाव मिळत आहे. मात्र, साखरेचा साठा चार लाख टनांनी कमी असल्याने या निविदांचे दरदेखील चढेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.