चंदिगड- हरियाणामधील 83 मतदान केंद्रांची स्थिती गंभीर स्वरूपाची तर 2,923 मतदान केंद्रे असुरक्षित असल्याचे स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी म्हटले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील एकूण 1,419 वस्त्यांमधील मतदान केंद्रांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ही बाब निदर्शनास आली आहे.
हरियाणामध्ये महाराष्ट्राबरोबरच 21 ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
जी मतदान केंद्रे असुरक्षित आणि गंभीर स्वरूपाची असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्या सर्व ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल, सूक्ष्म निरीक्षक, वेबकासिंटग तैनात केले जाईल, असे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) नवदीप विर्क यांनी सांगितले. कुरुक्षेत्र भागात 14 मतदान केंद्रांची स्थिती सर्वात जास्त गंभीर आहे.
त्याखालोखाल हिसार आणि पलवाल येथे प्रत्येकी 10, मेवात, सिरसा आणि पानिपत येथे प्रत्येकी 7, जिंद आणि भिवानीमध्ये प्रत्येकी 5, यमुनानगर आणि दादरीमध्ये प्रत्येकी 3, मेहंदरगडमध्ये 2, गुरुग्राम आणि कैथालमध्ये प्रत्येकी एक मतदार केंद्राची स्थिती गंभीर आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे मेवातमधील 342, गुरुग्राम, सिरसा आणि झाज्जरमधील अनुक्रमे 308, 292 आणि 254 मतदानकेंद्रे असुरक्षित असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. हरियाणामध्ये एकूण 10,309 वस्त्यांमध्ये 19,500 मतदानकेंद्रे आहेत.