प्रचाराचा नारळ फुटला
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज संकल्प रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. जलमंदिर ते पोवई नाक्यापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कांताताई नलावडे, अतुल भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मान्यवर, नगसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमुळे भाजपमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
विधानसभेच्या आखाड्यात शिवेंद्रराजे यांचे नाव सातारा-जावळी मतदारसंघासाठी अंतिम झाल्याने दोघांनी एकत्र अर्ज दाखल करण्याचे ठरवले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आधीच तयारी केली होती. ढोल्या गणपती येथे दर्शन घेऊन उदयनराजे मंगळवारी सकाळी 11 पूर्वी जलमंदिरात आले. तेथून सुरुची बंगल्यावर जाऊन त्यांनी शिवेंद्रराजेंची भेट घेतली. त्यानंतर दोघेही राजवाड्यासमोर मिरवणुकीसाठी सज्ज ठेवलेल्या वाहनात दाखल झाले. गांधी मैदानावर अलोट गर्दी झाली होती. “एकच आवाज उदयन महाराज’, “बाबाराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा पारंपरिक वाद्ये आणि शिंग, तुताऱ्यांच्या निनादात रॅली सुरू झाली. हजारो कार्यकर्ते पायी व मोटारसायकलींवरून सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गात दोन्ही राजे व मान्यवर नागरिकांना अभिवादन करत होते.
कमानी हौदावरून रॅली शेटे चौक, पोलीस मुख्यालय मार्ग पोवई नाक्यावर आली. तेथे उदयनराजे, शिवेंद्रराजे, ना. चंद्रकात पाटील, कराड दक्षिणचे भाजपचे उमेदवार अतुल भोसले, रिपाइंचे अशोक गायकवाड व मान्यवरांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तेथून सर्व जण पायी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल केला. हा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असताना शिवेंद्रराजे प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले. आपला अर्ज दाखल झाल्यावर उदयनराजेही चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत तातडीने प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले. तेथे शिवेंद्रराजे यांनी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी सौ. वेदांतिकाराजे भोसले व नीता केळकर उपस्थित होत्या.
आठही विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू : चंद्रकांत पाटील
या रॅलीत लोकांचा जोश पाहिला. दोन्ही राजे एकत्र यावेत, अशी लोकांची इच्छा होती. आता साताऱ्याचा विकास अत्यंत वेगाने होईल. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू, असा दावा ना. चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल झाल्यानंतर केला. युती म्हणजे ऍडजस्टमेंट असते. भाजपच्या पहिल्या यादीत दिग्गजांची नावे नाहीत, याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले विभागानुसार व कामगिरीच्या आधारे यादी जाहीर केली आहे. कोथरूड (पुणे) येथील उमेदवारीबाबत म्हणाले, मी काही पुण्याबाहेरचा नाही.