बळीराजा गुंतला “रब्बी’च्या मशागतीत

वाई तालुक्‍यात पावसाने उघडीप शेतकऱ्यांची लगभग 

वाई –
अतिवष्टीमुळे जवळजवळ खरीप हंगाम वायाच गेला आहे. ऊस, हळद यासारखी पिके वगळता घेवडा, सोयाबीन तसेच कडधान्याची पिके अतिपावसामुळे अक्षरश: शेतातच कुजून गेल्याने सध्या जमिनी मोकळ्याच आहेत. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाची चिंता सोडून रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. सध्या तालुक्‍यातील शेतकरी वर्ग हा रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतात घातलेल्या बियाणाची किंमतसुध्दा न निघाल्याने तालुक्‍यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाई तालुक्‍याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले पिक शेतातच कुजले.तर पूर्व भागात निघालेल्या पिकांची प्रतवारी कमी झाली. तसेच शेतीच्या मालाला हमी भाव न मिळल्याने शेतकऱ्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. झेंडू, टमॅटो सारख्या पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी माल शेतातून काढलाच नाही.

कांद्याने तर पुरते रडविले आहे, परतीच्या पावसाचा काही अंदाज येत नसल्याने शेतकऱ्याने पावसाची वाट न पाहता रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी उरकून घेण्यात धन्यता मानली आहे. पावसाने चांगली उघडीप दिल्याने रब्बी हंगामासाठी तालुक्‍यात अनेक ठिकाणी बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. तसेच सध्या निवडणुकीचा हंगाम जोरात असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकण्यावर भर दिलेला आहे.

तर काही बागायती गावांमध्ये शेतीला परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले, शेतातील पाणी हटत नसल्याने हळद, ऊस, भाजी-पाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच दोन दिवसांपासून आभाळाचे वातावरण असून प्रचंड प्रमाणात धुके पडले आहे, प्रचंड धुके ही शेतीसाठी समाधानाची बाब नाही.
रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरणीसाठी वाई तालुक्‍यात शेतीची मशागत चालू आहे. त्यातच बैलजोडी सध्या ठराविक ठिकाणीच मिळत असल्याने त्यांचे भाव वधारले आहेत.

बैलजोडी बरोबर मजुरांचा प्रश्‍नसुध्दा शेतकऱ्यांना चांगलाच भेडसावत आहे. दुप्पट रोजगार देवूनही मजूर मिळत नसल्याने एकमेकांच्या शेतात वारुंगळा करण्यातच शेतकरी धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा यांत्रिकी शेतीकडे झुकलेला आहे. शेतीला लागणाऱ्या बियाणाच्या व खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, त्यामुळे बळीराजाची दमछाक होताना दिसत आहे. चांगल्या पद्धतीची बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी दुकानातून गर्दी करताना दिसत आहेत. सध्या निवडणुकीमुळे मतदारांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे उमेदवारसुध्दा शेताच्या बांधावर जाण्याच्या मनस्थितीत आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असला तरीही रब्बी हंगाम चांगला येण्याची खात्री बळीराजा देताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.