पुण्यात विधानसभेची एकही जागा न मिळाल्याने मुंबईत सामूहिक राजीनामे देण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षश्रेष्ठींकडून पुन्हा बोळवण करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असली, तरी पुण्यात पक्षाला एक जागा मिळावी म्हणून चर्चा सुरू असून दि.3 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहवी, असे सांगत पुण्यातून गेलेल्या पदाधिकाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न “मातोश्री’वर करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली असून सामूहिक राजीनाम्याच्या तयारीने गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणखी दोन दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेत परत फिरावे लागले.
पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेसाठी 2009 चा फॉर्म्युला राबविण्याची मागणी केली होती. मात्र, 2019 च्या युतीच्या जागा वाटपाचे पहिले सूत्र “ज्याचा विद्यमान आमदार त्याचीच विधानसभेची जागा’ हे असल्याने पुण्याचे चित्र चार महिने आधीच स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतरही युतीची अनिश्चितता असल्याने शिवसेनेकडूनही सर्वच इच्छुकांना मुंबईत बोलावून तयारी करण्यास सांगण्यात येत होते.
मात्र, सोमवारी पुण्यातील आठही जागांवरील भाजप उमेदवारांची नावे चर्चेत आल्याने त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या अनेक इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावत अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्षातील ही बंडाळी अडचणीची ठरणार असल्याने पदाधिकाऱ्यांनी या सर्वांना घेऊन मंगळवारी सकाळीच “मातोश्री’ गाठली. हे सर्व पदाधिकारी मुंबईत जात असतानाच; भाजपची यादी जाहीर झाली. हे पदाधिकारी मुंबईत पोहचल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली, तर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी राऊत यांनी त्यांना अद्याप काही जागांची चर्चा युतीत शिल्लक असून त्यात पुण्यातील जागा असल्याचेही सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपने उमेदवार जाहीर केले असले, तरी अद्याप अर्ज भरण्यास तीन दिवस आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत पुण्यात एखादी जागा मिळू शकते, असा दिलासा देण्याचा प्रयत्न राऊत यांनी केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पुण्याबाबत सर्वच पदाधिकारी तसेच इच्छुकांच्या भावना तीव्र आहे. त्यामुळे पक्षनेत्यांशी याबाबत चर्चा करण्यासाठी “मातोश्री’ येथे बैठक झाली. त्यात पुण्यासाठी एक जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याबाबतचा निर्णय दि.3 ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.
– संजय मोरे, पुणे शहर प्रमुख, शिवसेना.