ग्रामिण आणि शहरी भागाची सांगड असलेला मात्र, गेल्या 5 वर्षांत आयटी कंपन्यांमध्ये परप्रांतिय तसेच उच्च शिक्षित मतदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा पेपर कठीण होणार की सोप्पा हे ठरणार आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने पकड मिळविली असली तरी, 2009 आणि 2014 च्या विधानसभेला या मतदारसंघात शिवसेनेने दोन्ही वेळेस दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवित आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात युती होऊन भाजपकडे ही जागा कायम राहिल्यास हा पेपर भाजपला सोपा जाणार आहे. तर शिवसेना स्वतंत्र लढल्यास भाजपला 2014 प्रमाणे पुन्हा विजय मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
2009 मध्ये झालेल्या विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेत वडगावशेरी विधानसभा मतदार संघ अस्तिवात आला. त्यापूर्वी हा मतदारसंघ शहरी भागाचा समावेश असलेला बोपोडी आणि ग्रामिण भागात हवेली विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता. मात्र, 2007 च्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीने बाजी मारली होती. त्यामुळे त्या भागात भाजपचा केवळ 1 नगरसेवक होता. परिणामी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी तब्बल 33 हजार मताधिक्याने विजय मिळविला. तर युतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार अजय भोसले दुसऱ्या क्रमांकावर राहीले. त्यानंतर 2014 मध्ये युती तुटल्याने आणि आघाडीतही बिघाडी झाल्याने सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढले. त्यात भाजपचे विद्यमान आमदार जगदिश मुळीक यांनी विजयश्री खेचून आणली मात्र, त्यांना पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळालेल्या सुनील टिंगरे यांचा सामना करावा लागला. यावेळी मुळीक यांना 5 हजार 325 मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेण्यास नुकतीच सुरुवात केली होती.
पुढे 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र, भाजपने या मतदारसंघात आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या मतदारसंघात भाजप नगरसेवकांची संख्या 14 आहे. त्यात रिपाइंचे 2 नगरसेवक कमळाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक असून शिवसेनेचे 3 तर एमआयएमचा 1 नगरसेवक आहे. त्यामुळे निर्मितीनंतर पहिली 5 वर्षे आघाडीचा बालेकिल्ला असलेला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.
राजकीय गणितांचा पडणार प्रभाव 2019 च्या विधानसभेला युतीच्या राजकीय गणितांवर या मतदारसंघाचे पुढचे निर्णय ठरणार आहेत. विद्यमान आमदार भाजपचा असल्याने भाजपने प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्याचवेळी शिवसेनेने सलग दोनवेळा पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याने या मतदारसंघावर आघाडीच्या जागावाटपात दावा केला आहे. त्याचवेळी या मतदारसंघात रिपाइं आणि एमआयएमचाही मतदार असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाही परंपरागत मतदार आहे. तर 2014 च्या विधानसभेला या मतदारसंघात लक्षणीयरित्या वाढलेल्या उच्च शिक्षित तसेच परप्रांतिय मतदारांचा कल भाजपच्या बाजूला आहे. त्यामुळे युती न झाल्यास भाजपला या मतदासंघात अटीतटीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
2014 निकालाची स्थिती
जगदिश मुळीक (भाजप)
66 हजार 908
सुनील टिंगरे (शिवसेना)
61 हजार 583
बापुसाहेब पठारे (राष्ट्रवादी)
44 हजार 480
2009 निकालाची स्थिती
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी)
72 हजार 034
अजय भोसले (शिवसेना)
38 हजार 918
राजेंद्र एंडल (मनसे)
28 हजार 579