रोडरोमिओंचा धुमाकूळ : तळेगाव ठाण्याला दामिनी पथकाचे वावडे
तळेगाव दाभाडे – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथक नसल्याने रोडरोमिओंनी धुमाकूळ घातला आहे. रोडरोमिओंच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनींनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 23) धाव घेत वाढत्या रोमिओंना वेसण घालण्याची साद घातली आहे. त्यावेळी विद्यार्थिनींनी तक्रार केली. रोडरोमिओंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तळेगाव दाभाडे परिसरात शाळा व महाविद्यालय आहेत. हजारो विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची नियुक्ती केली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालय व परिसरातील विद्यार्थिनी व महिला स्वतःसुरक्षित समजत होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या परिसरात दामिनी पथक कार्यरत नसल्याने रोडरोमिओ बिनधास्त झाले आहेत. शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीच्या ठिकाणी विद्यार्थिनींना दिवसाढवळ्या छेडछाड केली जात आहे. रोडरोमिओ छेड केल्यावर विद्यार्थिनींना पोलिसात नाव सांगण्याचे बिनधास्त सांगत आहेत.
होणाऱ्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून शाळा व महाविद्यालय अर्ध्यावर सोडत आहे. काही मुली रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येण्याच्या अगोदरच रोडरोमिओंवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले की, दामिनी पथक लवकरच नियुक्त केले जाईल. रोडरोमिओंवर त्वरित कारवाई करण्यात येईल.