पुणे – कॅम्प परिसरामध्ये असणारे रेल्वेचे आरक्षण केंद्र दि.10 सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या केंद्रातून आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने केंद्र बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या ई-तिकिटांवर अधिक भर दिला जात असून पुणे रेल्वे स्थानक येथे आरक्षणासाठी पुरेशा खिडक्या कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर कॅम्पमधील केंद्रापासून साधारण एका किलोमीटच्या अंतरावर अलंकार आणि अपोलो टॉकिज येथे प्रवासी सुविधा केंद्र आहेत.
त्यामुळे हे आरक्षण केंद्र बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, यापूर्वी रविवार पेठेतील रेल्वे आरक्षण कार्यालयाची इमारत धोकादायक आढळून आल्याने या इमारतीतील आरक्षण केंद्र दि.1 ऑगस्टपासून बंद रेल्वे प्रशासनाने बंद ठेवले आहे.