भारत पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवेल

डीआरडीओचे डायरेक्‍टर जनरल प्रवीण मेहता
यांचा विश्‍वास

पुणे  – चांद्रयान मोहिमेसारखे काम करतो तेव्हा ते पूर्ण होवो किंवा न होवो, त्यातून मिळणाऱ्या शिकवणीतून काम पुढे नेले जाते. चांद्रयान 2.1 किमी अलीकडे असताना आपल्याशी संपर्क तुटला. मात्र, संपर्क कोठे तुटला, कसा तुटला याचा अभ्यास करून आपले शास्त्रज्ञ येत्या काळात हे काम पूर्ण करतील. यासह भारतीय आपले पाऊल चंद्रावर ठेवतील, अशा विश्‍वास डीआरडीओचे डायरेक्‍टर जनरल प्रवीण मेहता यांनी व्यक्त केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात मेहता यांनी सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मेहता यांच्या पत्नी मधु मेहता आदी उपस्थित होते. यावेळी मेहता यांच्या हस्ते गणरायाला अभिषेक करण्यात आला. “चांद्रयान 2′ मोहीम हाती घेऊन भारताने आतापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल गणरायाला तिरंगी हार अर्पण करुन पुढील मोहिमेच्या यशस्वितेसाठी त्यांनी प्रार्थना केली.

दक्षिण ध्रुव दिशेला यान पाठवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. आजपर्यंत त्या भागामध्ये प्रक्षेपण झाले नाही. तेथे “हेलियम 3′ मिळण्याची शक्‍यता होती. ते मिळाल्यास संपूर्ण पृथ्वीवर पुढील 500 वर्षे पुरेल इतकी उर्जा मिळणे शक्‍य होईल, असे मेहता यांनी यावेळी नमूद केले.

“बाप्पा’ चरणी “आईस्क्रिम’ मोदक

ओल्या नारळाचा किस, गूळ, ड्रायफ्रूट, केशर आणि दूध आदी पदार्थांचा वापर करुन किगा आईस्क्रीमचे गणेश गोसावी आणि किरण साळुंके यांनी तब्बल 127 लीटर “आईस्क्रिम’चा मोदक गणरायाला अर्पण केला. गणेशोत्सवात अर्पण केलेला हा अनोखा मोदक पाहण्याकरीता भाविकांनी गर्दी केली होती. आईस्क्रिम मोदक भक्तांना प्रसाद म्हणून यावेळी देण्यात आला. विशिष्ट तापमानात हा मोदक तयार करणे हे आव्हानात्मक काम होते. मात्र, गणरायाचा कृपेने आम्ही हा मोदक उत्तमरित्या साकारू शकलो, असे गणेश गोसावी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.