कोपरगाव – संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजला केंद्र सरकारच्या निती आयोगाअंतर्गत मिळालेल्या 20 लाख रुपये किमतीच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन संगणकतज्ज्ञ विजय नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, प्राचार्य डॉ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य के. एल. दरेकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनही भरविले होते. सुमित कोल्हे म्हणाले, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. येणाऱ्या काळात तरुण पिढीला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत केल्याशिवाय पर्याय नाही. याचा प्रत्यय म्हणजे आजचे अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन आहे.
विद्यार्थ्यांना शास्त्र, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांतील बारकावे समजावेत, यासाठीची उपकरणे या प्रयोगशाळेमध्ये देण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोबोटिक्स, सेन्सर्स, थ्रीडी प्रिंटर्स, इलेक्ट्रॉनिक्स किट्स अशी उपकरणे देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा नवनिर्मितीचा ध्यास पूर्ण होणार आहे. नायडू म्हणाले, विद्यार्थ्यांनी शास्त्रीयदृष्टिकोन ठेवून नावीन्याचा ध्यास घ्यावा. आपला प्रत्येक प्रकल्प समाजाच्या प्रगतीसाठी कसा उपयोगी पडेल, हे पहावे. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी स्वागत केले.