ओझरमध्ये लाल मातीतल्या कुस्तीचा आखाडा रंगला

पाच दिवसांच्या गणेशजयंती सोहळ्याची उत्साहात सांगता

ओझर – अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरू असलेला श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता लाल मातीवरील कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली. कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांची पारणे फेडतील अशा नामवंत मल्लांच्या कुस्त्या यावेळी झाल्या. देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांच्या हस्ते हंगामाचे उद्‌घाटन झाले. विशेष म्हणजे यावेळी महिलांच्या देखील कुस्त्या झाल्या. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई, सातारा जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी या आखाड्यास हजेरी लावली.

ओझर आणि परिसरातील शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द आदी पंचक्रोशीतील गावातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आखाड्यास गर्दी केली होती. आखाड्याचे लिलावदार मुरलीधर घेगडे, आर. एल. मांडे (66,666) पागोट्याचे लिलावदार चिंतामण जाधव व दत्तात्रय कवडे (22,001) पानसुपारीचे लिलावदार सुरेश सहादू कवडे (21001) या सर्वांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आखाड्यात पंच म्हणून देवस्थान ट्रस्टचे विद्यमान खजिनदार किशोर कवडे, विश्‍वस्त गणेश कवडे, मंगेश मांडे, अजित कवडे, मिलिंद कवडे, कैलास घेगडे, गणपत कवडे तंटामुक्ती अध्यक्ष ओझर नं. 2 भास्कर कवडे, ग्रामविकास अध्यक्ष शहाजी रवळे, विनायक मांडे, बाळासाहेब टेंभेकर, गणेश राऊत यांनी काम पहिले.

यावेळी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर शहर उपनगराध्यक्ष अलका फुलसुंदर, राष्ट्रवादी कॉंग्रेस जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अकुंश आमले, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे, माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, उपसरपंच सुरेश टेंभेकर, समीर मांडे, जुन्नर तालुका परिट समाज अध्यक्ष सुभाष दळवी, आदी मान्यवरांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या.

कै. अप्पासाहेब जोगळेकर यांच्या स्मरणार्थ जोगळेकर कुटुंबियांकडून विजयी पहिलवानास ढाल व 1111 रुपये देण्यात आले. शेवटची कुस्ती सत्यशील शेरकर यांच्या हस्ते 5000 रकमेची झाली. आखाड्याचे समालोचन देवस्थानचे विश्‍वस्त कैलास मांडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, माजी उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे यांनी केले. यात्रेउत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती ट्रस्ट आणि ग्रामविकास संस्था ओझर यांनी केले. या नियोजनामध्ये, उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, सचिव आनंदराव मांडे, विश्‍वस्त गणपत कवडे, दशरथ मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित, देवस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग, ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. रात्री 9.30 वाजता संतोष पवार लिखित “यदा कदाचित’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.