सातारा – गौराईंचे आगमन अवघ्या काही तासांवर आले असताना सराफ बाजारात गौराईच्या दागिन्यांना महागाईची झळ बसली आहे. मजुरी पकडून प्रतितोळा अठराशे ते बावीसशे रुपयांचा दर द्यावा लागत आहे. गौराईंना अस्सल दागिने घालण्याची हौस वाढत चालली असून मंगळसूत्र, ठुशी, बाजुबंद, कमरपट्टा यांची घडणावळ महागल्याने गौरीच्या दागिन्यांनासुद्धा चढे भाव आहेत. फॉर्मिंग ज्वेलरीसुद्धा प्रतितोळा अठराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान आहे. गौरींचे आगमन उद्या (गुरुवार) होत असून शहर व उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये बुधवारी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. गणपतीसाठी नवनवी आभूषणे घेण्यालाही ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे दिसून येत आहे.
खरेदीसाठी झुंबड
गौरीच्या आभूषणांसाठी शहरात राजवाडा, मोती चौक, खण आळी, 501 पाटी दरम्यानचा सराफ बाजार सोने भाववाढीच्या काळातही गजबजला होता. त्यात बाप्पांसाठी सुंदर कंठीमध्येही विविधता पाहायला मिळत आहे. अमेरिकन डायमंडस्च्या दागिन्यांनाही यंदा भाविकांनी पसंती दर्शविली आहे. या दागिन्यांची किंमत 60 रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहे. बाप्पांच्या मुकुटामध्ये “फेटास्टाईल’ मुकुटांना जास्त पसंती आहे. धातू, कापड अशा दोन प्रकारांमध्ये खडे, मोती, कुंदन, मोरपंख अशी सजावट असलेल्या मुकुटांना अधिक मागणी आहे. या मुकुटांची किंमत 150 रुपयांपासून पुढे आहे. बाप्पाच्या सोंडेसाठी, कानासाठी असणारे विशेष दागिने, तोडे, बाजुबंद, भिकबाळी, वाळे, अशा आभूषणांसह गौरीच्या दागिन्यांनी सराफ बाजार लखलखत आहे. गौरींच्या गळ्यात घालण्यासाठी कंठी, डायमंडचा नेकलेस असावा, असा सुवासिनींचा हट्ट आहे. मात्र, डायमंड नेकलेसच्या किमती ऐंशी हजारापासून सुरू होत आहेत.
गौरीचे दागिने
गौरींसाठी कानातले दागिने, नथ, बांगड्या, तोडे, लक्ष्मीहार, कमरपट्टा, मुकुट, ठुशी, मंगळसूत्र, वाकी, बोरमाळ, असे दागिने खडे, मोती व सोनेरी अशा विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. खड्यांच्या दागिन्यांची किंमत जास्त असून पूर्ण दागिन्यांच्या सेटची किंमत तीन हजारांपासून सहा हजारांपर्यंत आहे तर मोत्यांच्या सेटची किंमत पाचशेहून अधिक आहे. दागिन्यांबरोबर गौरीसाठी नऊवारी व सहावारी साड्या 300 ते 3000 पर्यंत उपलब्ध आहेत.
बाप्पाच्या दागिन्यांची विविधता
कमरपट्टा, छत्र, तोडे, आसन, नारळ, केळे, बुगडी, कुंडल, त्रिशूळ, चांदीचे ताट, भिकबाळी, कर्णफुले, जास्वंदीचे फुल, उंदीर, मोदक, कंठी, सोंडपट्टी, मुकूट, केळीचे पान, विड्याचे पान, दुर्वाहार, जास्वंदी हार, मोदक हार, शेला, उपरणे, बाजुबंद, केवड्याचे पान, कमळ, वाळा, चांदीचे पाट, चौरंग, कलश, घंटी, चांदीची फळे, साखळी, परशू असे नानाविध दागिने पाहायला मिळत आहेत.