ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची उधळण आणि वरूणराजाचेही आगमन

यंदा मिरवणुकीत कमी मंडळे, लवकर आटोपली मिरवणूक

चिंचवडमध्ये आकर्षक देखावे
चिंचवड येथे दळवीनगर येथील गजाजन मित्र मंडळ मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी दोन वाजता चापेकर चौकातून विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास दळवीनगर येथील बाल तरुण मित्र मंडळाचे आगमन झाले. मंडळाने विठ्ठलाच्या मनमोहक मूर्तीचा देखावा उभारला होता. रात्री नऊच्या सुमारास क्रांतीविर भगतसिंह मित्र मंडळाचे बाप्पा फुलांनी सजवलेल्या पालखीतून दाखल झाले. या पालखीचे सारथ्य नेहमीप्रमाणे महिलांनीच केले होते. संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळासोबत (चिंचवडचा राजा) वारकऱ्यांचे भजनी मंडळ आणि पाठीमागे ढोल-ताशा पथक होते. “सुवर्ण मयूर रथात’ गणरायची सुबक मूर्ती विराजमान झाली होती. श्री दत्त मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेल्या रथातून मिरवणूक काढली होती.

जय तुळजा भवानी मित्र मंडळाचा गणपती हलगी वादनाच्या गरजात विसर्जन घाटाकडे रवाना झाला. गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळाने आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती. त्यानंतर चिंचवडगावातील मोरया मित्र मंडळाच्या गणपतीची भवानी रथातून मिरवणूक चापेकर चौकात आली. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाचा गणपती राज-गोविंद रथातून वाजत गाजत आला. रथामध्ये बालाजीची मोठी मूर्ती होती. चिंचवडगावातील श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने “गजरथ’ साकारला होता. या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता.

ओंकार तरुण मित्र मंडळानंतर नवतरुण मित्र मंडळाची मिरवणूक चौकात आली. या मंडळाने शंकराची भव्य मूर्ती असलेला “शिवरथ’ साकारला होता. मुंजोबा मित्र मंडळाने तबला, वीणा आदी संगीत वाद्यांची आकर्षक फुलांची सजावट केली होती. उत्कृष्ट तरुण मित्र मंडळ फुलांची उधळण करीत चौकात आले. पूरग्रस्तांना मदत करतानाची “एनडीआरएफ’चा बोट दाखविली होती. नवभारत तरुण मंडळाने फुलांच्या सजावटीमध्ये मयूररथ साकारला होता. तानाजीनगर येथील श्री शिवाजी उदय मंडळाने ढोल ताशाच्या दणदणाटात आणि फुलांची उधळण केली.

लोंढेनगर येथील आदर्श तरुण मित्र मंडळाने वाहतुकीचे नियम पाळा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, मुलगी झाली म्हणून बाळगू नका भिती, गुणवान मुली तर देशाची संपत्ती, असे संदेश दिले. एम्पायर एस्टेट मित्र मंडळाने आकर्षक असा रथ साकारला होता. सव्वा अकराच्या सुमारास श्री मयूरेश्‍वर मित्र मंडळ ढोल ताशाच्या दणदणाटात विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले. मंडळाने विद्युत रोषणाई केली होती.

रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. मात्र भक्‍तांचा उत्साह तिळभर कमी झाला नव्हता. त्यानंतर गावडे पार्क मित्र मंडळाने संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा लक्षवेधक -भक्‍ती-शक्‍ती’ रथ साकारला होता. श्री लक्ष्मीनगर मित्र मंडळाची विठ्ठलाची दहा फुटाची मूर्ती लक्ष्यवेधक होती. श्रीमान महासाधू मोरया गोसावी मित्र मंडळाने सुबक शंकराची मूर्ती साकारली होती. सुदर्शन मित्र मंडळाचा गणपती भक्‍तीरथातून विसर्जन घाटाकडे रवाना झाला.

या रथावर विठ्ठलाची मूर्ती, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती होत्या. श्रीदत्त मित्र मंडळाच्या मिरवणुकीनंतर समता मित्र मंडळाचे (दळवीनगरचा राजा) बाप्पा “श्रीकृष्ण रथा’त विराजमान झाले होते. या मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनीच्या मुलींचे ढोलताशा व टिपऱ्यांचे पथक होते. चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शाहू मंडळाने यंदा प्रथमच डीजेचा वापर केला. मात्र चौकात आल्यावर डीजे बंद करण्यात आला. राष्ट्रप्रजा मित्र मंडळानंतर 11.50 वाजता शिवप्रसाद मित्र मंडळाचा मिरवणुकीतील अखेरचा गणपती चौकात आला. या मंडळाने फुलांची आरास केलेल्या रथात गणराज विराजमान केले होते. त्यानंतर मिरवणूक सोळ्याची सांगता झाली.

सर्वच घाटांवर “ऑल इज वेल’
महापालिकेच्या हद्दीतील 26 घाटांवर अग्निशामक विभागाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे यंदा विसर्जना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून सर्व घाटांवर आनंदात गणेश विसर्जन झाले आहे. यंदा गणेश विसर्जनासाठी 4 बोटी 150 कर्मचारी व 40 प्रशिक्षणार्थी अधिकारी असा मोठा फौज-फाटा व बचाव साहित्य घेऊन अग्निशामक विभाग आणि आपात्कालीन बचाव पथकाने चोख बंदोबस्त केला. विसर्जन घाटावर अग्निशामक विभाग, पोलीस प्रशासन व आपात्कालीन बचाव पथकाने घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली होती. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. ताथवडे व वाल्हेकरवाडी याठिकाणी काही नागरिकांनी धोकादायक पद्धतीने नदीच्या पात्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशामक विभागाच्या जवानांनी वेळीच त्यांना बाहेर काढले. हा प्रकार वगळता 26 घाटावंर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पहिल्यांदाच रात्री 12 पूर्वी सांगता
चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दरवर्षी 57 गणेश मंडळे सहभागी होतात. मात्र यंदा प्रथमच 40 गणेश मंडळे चापेकर चौकातून पुढे गेली. 17 मंडळे चौकात आलेच नाहीत. यामुळे प्रथमच 11 वाजून 50 मिनिटांनी विसर्जन मिरवणूक सोहळ्याची सांगता झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)