सार्वजनिक उत्सव कायद्याच्या चौकटीत आवश्‍यक

नुकताच गणेशोत्सव पार पडला. पुढे नवरात्रोत्सव, मग शिवजयंती असे सार्वजनिक उत्सव येतील. सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्यात निरनिराळे उत्सव नियमित साजरे होतात. मात्र, अनेकदा अशा उत्सवात समाजाचा सहभाग असल्याने कायदेशीर चौकटीत बसूनच हे उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. अन्यथा त्या सार्वजनिक मंडळांवर धर्मदाय विभागाकडून सक्त कारवाई हाऊ शकते.

या सार्वजनिक उत्सवांमधून प्रामुख्याने मंडळातील कार्यकर्त्यांकडून वर्गणी गोळा केली जाते. एखादा उत्सव साजरा करायचा असेल तर सर्वप्रथम तुमचे मंडळ धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत करणे गरजेचे आहे. संस्था नोंदणी अधिनियम व महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर तुमचे मंडळ नोंदणी नसताना तुम्ही वर्गणी गोळा केली तर या कायद्यांतर्गत तुम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मोठ्या दंडाच्या शिक्षेस पात्र ठरू शकता.

वेगवेगळे उत्सव, सण साजरे करताना सामाजिक सहभाग हवा असल्यास वरील कायद्याच्या कलम 41 (सी) या कलमांतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वर्गणी गोळा करून उत्सव साजरा करण्याची परवानगी घेता येते. सदर परवानगी फक्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळते. याशिवाय भुकंप, महायुद्ध, महापूर, अपघात इत्यादींसारख्या नैसर्गिक आपत्तीकरिता वर्गणी गोळा करावयाची झाल्यास अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपात धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

अशा प्रकारे तात्पुरत्या किवा कायमस्वरूपी नोंदणी पद्धतीने तुमचे मंडळ, संस्था नोंदणी झाल्यास त्याचा नोंदणी क्रमांक वर्गणी गोळा करणाऱ्या पावती पुस्तकावर स्पष्ट असावा. त्यानंतर गोळा केलेल्या वर्गणीचा हिशेब तुम्हाला धर्मादाय कार्यालयाला देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे वरील बाबींची पूर्तता करून तुम्ही गोळा केलेली वर्गणीच कायदेशीर ठरते. एखादा उत्सव साजरा करायचा असल्यास सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून या उत्सवापूर्वी मंडळाना/संस्थांना स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे असते. जातीय तेढ उत्पन्न होणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही, वाहतूक व्यवस्थेस अडथळा होणार नाही, अशा बाबींचा अभ्यास करून पोलीस प्रशासनाद्वारे मंडळांना परवानगी दिली जाते. बरेचदा जरी तुमचे मंडळ नोंदणीकृत असले तरी वर्गणीसाठी जर तुम्ही कुणाला जबरदस्ती केली, त्याचा हिशेब ठेवण्यास कसूर केली तर धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे तुमचे मंडळ/संस्था रद्द पासून मोठ्या रकमेचा दंड वसूल करण्याचे अधिकार या विभागाला आहेत. काही ठिकाणी तर पोलीस यंत्रणाद्वारे देखील वर्गणीस जबरदस्ती केल्यास खंडणीचे देखील गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसूनच उत्सव साजरे करणे गरजेचे आहे.

– रोहिणी पवार

Leave A Reply

Your email address will not be published.