बाप्पांच्या निरोपाला वरुणराजाही गहिवरला !

लोणावळा, देहूगाव परिसरात गणरायाला निरोप; मंडळांची पारंपरिक वाद्यांना पसंती

लोणावळा/देहूगाव  – गेली दहा दिवस लाडक्‍या गणरायाची भक्‍तीभावाने सेवा केल्यानंतर गुरुवारी (दि. 12) विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप दिला. मुसळधार पावसात ढोल-ताशांचा निनाद, तर कुठे बॅण्ड, बॅंजोचा दणदणाट…, तर कुठे मुक्‍त गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पाला निरोप देताना “पुढच्या वर्षी लवकर या’ हे सांगत भक्‍तांच्या डोळ्यात अश्रू तरळले. लोणावळ्यात पावसाच्या हजेरीमुळे बाप्पांच्या निरोपाचा सोहळाही गहिवरून गेल्याचे चित्र दिसून आले.

मुसळधार पाऊस सुरू असतानाही लोणावळा शहरात सात तासांच्या जल्लोषपूर्ण आणि तितक्‍याच शांततामय वातावरणात विसर्जन मिरवणूक झाली. मिरवणूक पाहण्यासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांनी विसर्जन मार्गाच्या दुतर्फा गर्दी केली होती. लोणावळा शहरात सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आटोपली.

लोणावळा शहरातील 18 सार्वजनिक गणेश मंडळांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. तर अन्य तीन मंडळांनी मुख्य मिरवणुकीपूर्वी मूर्तीचे विसर्जन केले. “डॉल्बी सिस्टम’वर असलेल्या अनेक निर्बंधांमुळे यंदा सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-लेझीम सारख्या परंपरागत वाद्याला तसेच बॅण्ड आणि बॅण्जोला पसंती दिल्याचे दिसून आले.
लोणावळा शहरातील पहिला मनाचा गणपती रायवूड गणेशोत्सव मंडळाचा गणपती सायंकाळी पाच वाजता शेतकरी पुतळा चौकात विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला. त्यानंतर तरुण मराठा मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गवळीवाडा आणि शेतकरी भजनी मंडळ, वलवण हे अनुक्रमे मानाचे सर्व गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाले.

या सर्व गणेश मंडळांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील महत्वाच्या शिवाजी चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे तसेच रामदेव भक्‍त मंडळ यासारख्या संघटनासोबतच लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्यामार्फत स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

जयचंद चौकात शिवसेनेच्या वतीने मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी दरवर्षी अन्नदान करण्यात आले. याचा लाभ विसर्जनासाठी आलेल्या हजारो कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घेतला. यंदा मनाचे पहिली पाच मंडळे वगळता अन्य बहुतेक सर्वच मंडळींनी गुलाल विरहित मिरवणूक काढीत एक आदर्श घालून दिला.

सुमारे सात तास चाललेल्या या मिरवणुकीत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे तुंगार्ली येथील ओमकार तरुण मंडळाची मिरवणूक ही आकर्षक ठरली. ओमकार तरुण मंडळाचे हिंदुत्व ढोल-लेझीम पथक आणि त्यांनी साकारलेले “महालक्ष्मी’ हा देखावा लक्ष वेधत होता. महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी “स्वच्छता रथ’ या मिरवणुकीत सादर केला. या मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

देहुरोड  – देहू-देहुरोड परिसरात संगीतच्या तालावर, बॅण्ड पथक, ढोल-ताशांच्या आवाजात विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट केलेल्या रथातून विसर्जन मिरवणूक, फुलांच्या पाकळ्यांची उधळण… अशा भावपूर्ण वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात गणेश भक्‍तांनी भावपूर्ण निरोप घेतला. विसर्जनासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

देहूगाव परिसरातील श्रीमंत नवशा गणपती मंडळ, शिरीषकुमार मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, ओंकार मित्र मंडळ, यंगस्टार मित्र मंडळाने, सिद्धीविनायक मित्रमंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, संत तुकाराम मित्र मंडळांनी आकर्षक रंगीत विद्युत रोषणाई, फुलाच्या सजावट केलेल्या आकर्षक रथातून कार्यकर्त्यांनी संगीताच्या तालावर नाचत गावातून मिरवणूक काढली. रात्री बारा वाजण्यापूर्वी गणेशोत्सव मंडळांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात इंद्रायणी नदीत बाप्पाचे विसर्जन झाले.

हनुमान मित्र मंडळ, क्रांतीविर मित्र मंडळ, अजिंक्‍य मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळाने सायंकाळी शांततेत गणेश विर्सजन केले. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. देहुरोड बाजारपेठेत रंगीत विद्युत रोषणाई व सजावट केलेल्या रथातून, तर महात्मा फुले अखिल भाजी मंडई मंडळ, सुदर्शन मंडळाने मंडळ, नवशक्‍ती चैतन्य मित्र मंडळ, हनुमान तरुण मंडळ, अजिंक्‍य मित्र मंडळ, न्यू गोल्डन ग्रुप, लोकमान्य टिळक मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, विशाल मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ यांच्यासह बहुतेक मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. बॅण्ड, ढोल, झांजपथक, संगीताच्या ताल, फटाक्‍यांची आतषबाजी, फुलांच्या उधळण करीत काही गणेश मंडळांनी देहूगाव येथे, तर काही मंडळांनी रावेत येथे गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)