जुलैची सहाव्यांदा तर ऑगस्टची तिसऱ्यांदा सभा तहकूब
सभा पुन्हा लांबणीवर ः सत्ताधाऱ्यांकडून सभा तहकुबीचे अर्धशतक
पिंपरी – महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपला शहर विकास व सभा कामकाजाबाबत जराही गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जुलै महिन्याची सलग सहाव्यांदा तर ऑगस्टची तिसऱ्यांदा सभा तहकूब केली. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार या प्रमुखांनीच सभेला दांडी मारली. तहकूब दोन्ही सभा शनिवारी (दि. 7) होणार आहेत.
जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित केल्या होत्या. उपमहापौर सचिन चिंचवडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दुसऱ्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून महासभा तहकूब करण्याचा खेळ संपवून भाजप पदाधिकारी आज सभाकामकाज पुर्ण करतील अशी अपेक्षा शहरवासियांना होती. परंतु, आज पुन्हा महासभा लांबणीवर टाकल्या आहेत.
भाजपच्या सभा तहकुबींच्या “तारीख पे तारीख’ धोरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव लालफितीत अडकत आहेत. महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आहेत. 14 मार्च 2017 रोजी पहिली सभा होवून नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, सभेच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांमध्ये उदासीनता आहे. गेल्या अडीच्या वर्षांच्या कालावधीत तब्बल 50 वेळा महासभा तहकूब करण्यात आल्या आहेत.
मान्यवरांना श्रद्धांजली म्हणून काही मिनिटे सभा तहकूब करुन पुन्हा सभेचे कामकाज सुरु करणे अपेक्षित असताना दोन-दोन महिने सभा कामकाज पुढे ढकलण्यात येत आहेत. वादग्रस्त प्रस्तावांवरील चर्चा टाळणे, प्रस्तावांची “सेटींग’, पक्षांतर्गत राजकारण, गटबाजी, विरोधी गटाचे प्रस्ताव हाणून पाडणे, प्रशासनावर दबाव आदींसाठी सभा तहकुबीचे राजकारण केले जात आहे. जुलै महिन्याच्या महासभेला सप्टेंबर उजाडला तरीही मुहूर्त लागला नाही. विविध कारणांनी जुलै महिन्याची महासभा सलग सहा वेळा तहकूब करण्याचा विक्रम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. तर, ऑगस्ट महिन्याची सभा तहकूब करण्याची हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे अनेक महत्त्व पूर्ण प्रस्ताव लांबणीवर पडले आहेत.
अन् चिंचवडे झाले दुसऱ्यांदा महापौर !
महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याची आणि अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. याबाबतचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर मुंबईला गेले असल्याने ते सभेला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले. महापौरांच्या गैरहजेरीमुळे औट घटकेसाठी का होईना, उपमहापौर सचिन चिंचवडे यांना दोनदा महापौर म्हणून पीठासनावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.