हुतात्मा बाबु गेनू मंडळ
हुतात्मा बाबु गेनू मंडळाच्या श्रींची मिरवणूक सकाळी 8 वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होणार आहे. उत्सव मंडपापासून ही मिरवणूक निघणार असून शनिपार चौक, बाजीराव रोड, लिंबराज चौक, लक्ष्मी रोडमार्गे बेलबाग चौक, दत्तमंदिर, रामेश्वर चौकामार्गे 11 वाजेपर्यंत मिरवणूक मंडपात येणार आहे. सकाळी 11 वाजता मंडळाचे संस्थापक शिवाजी मुजुमले, विश्वास शितोळे, सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. फुलांच्या “मयुर रथा’ मध्ये “श्रीं’ची मूर्ती विराजमान होणार आहे. गजलक्ष्मी, शिवतेज, रूद्रगर्जना आणि श्रीराम ही ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या “गणराया’ची प्रतिष्ठापना मिरवणूक सकाळी 8.30 वाजता मंदिरापासून सुरू होईल. तर प्रतिष्ठापना सकाळी 11.30 वाजता होणार आहे. पुनीत बालन आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. श्रींच्या रथाचे सारथ्य प्रथेप्रमाणे महापौर मुक्ता टिळक, भिडे गुरुजी आणि पुनीत बालन करणार आहेत. मिरवणुकीमध्ये आढाव नगारा वादन असेल. तर श्रीराम, शिवनेरी, अतुल्य, वाद्यवृंद, सामर्थ्य आणि कलावंत पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाच्या “श्रीं’ची आगमन मिरवणूक सकाळी 9 वाजता मुख्य मंदिरापासून निघणार आहे. मुख्य मंदिरापासून बाबु गेनू चौक, रामेश्वर चौक, गाडीखाना चौकामार्गे मंडईतून उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. तर “श्रीं’ची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. यंदाचा देखावा असलेले तीर्थंकर जैन मंदिर हे जैन आणि राजस्थानी शैलीत साकारण्यात आले आहे. या मंदिराला अधिक आकर्षक बनविण्यासाठी खास साजेशी प्रकाश योजनादेखील असेल.