ढोल-ताशांच्या गजरात होणार बाप्पांचे आगमन
देखावे तयार करण्यासाठी मंडळांची लगबग
रविवारी सायंकाळपासूनच मूर्ती खरेदीला प्राधान्य
पुणे – “ओंकारस्वरूप गणनायक’ अर्थातच लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मंगलमय सोहळ्याचा प्रारंभ आजपासून होत आहे. गणेशोत्सवामुळे सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या होत्या. घरच्या गणपतीच्या आगमनासाठी पहाटेपासूनचा मुहूर्त असल्याने गणेशभक्तांनी रविवारी सायंकाळपासूनच गणपती बाप्पाला घरी नेणे पसंत केले.
विद्येची आणि बुद्धीची देवता असणारा गणराया घराघरांत सुख, शांती, समाधान घेऊन येणार असून त्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. शहराच्या सांस्कृतिक परंपरा आणि इतिहासामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी गेले पंधरा दिवस उत्सवाच्या तयारीचे वेध लागलेले असतात. सजावटीसाठी लागणारे साहित्य तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखाव्यासाठी सुरू असणारी लगबग गेले अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अखेर बाप्पांचे आगमन होणार असल्याने सगळीकडे जय्यत तयारी करण्यात सुरू आहे. या सोहळ्यासाठी ढोल-ताशा पथकेदेखील सज्ज झाली असून ढोल-ताशांच्या गजरात गणेशमंडळांचे “बाप्पा’ आज विराजमान होणार आहेत. या सोहळ्यात अनेक सार्वजनिक मंडळांनी पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे तयार आले आहेत.