शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील तुषार फडतरे याने स्पेन माद्रिद येथे 19 ते 26 ऑगस्ट रोजी झालेल्या तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून देत देशासह महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
शेतकरी कुटुंबातील तुषार हा पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. दोन वर्षे प्रशिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना धनुर्विद्येची आवड निर्माण झाल्याने त्याने धनुर्विद्या खेळातही करीयर करण्याचे ध्येय जोपासले होते. त्यासाठी तुषार हा पर्वती ते पिंपरी याठिकाणी रोज धर्नुविद्येचे प्रशिक्षण घेऊ लागला. कोरेगाव भीमा सोसायटीचे अध्यक्ष असलेले तुषारचे वडील संजय फडतरे यांनी तुषारची खेळाची आवड लक्षात घेऊन त्याला परदेशी बनावटीचे अडीच लाखांचे धनुष्यबाण घेऊन दिले.
माद्रिद येथे झालेल्या स्पर्धेत तुषारने सांघिक कामगिरी करीत सखबीर सिंग, संगमप्रीतसिंग बिस्ला या सहकाऱ्यांसमवेत नेत्रदिपक कामगिरी करीत धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात कोलंबिया संघाचा पराभव करीत भारताला प्रथमच कांस्यपदक मिळवून दिले. स्पर्धेत 25 देशांतील खेळाडुंनी सहभाग घेतला होता.