जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब
कॉंग्रेसमधील गट-तटाचा वाद चव्हाट्यावर
पुणे -जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या एका जागेवर कॉंग्रेसच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती अपेक्षित होती. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातच दोन गट असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. आजच्या सर्वसाधारण सभेत होणाऱ्या नियुक्तीसाठी प्रदेश कॉंग्रेसकडून अंकिता पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्याच सदस्याचे नाव पुढे केल्यामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहात तणाव वाढल्यामुळे अखेर प्रशासनाला सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली.
सभागृहातील गोंधळ आणि दोन्ही कॉंग्रेस नेत्यांकडून येत असलेल्या दबावामुळे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते तातडीने रुग्णालयात गेले. तपासणी करून सभागृहात आले. तोपर्यंत विरोधकांनी कामकाज सुरू करून सभा तहकूब केली होती. दरम्यान, रत्नप्रभा पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत त्यांची नात आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या निवडून आल्या. त्यामुळे त्यांची स्थायी समितीच्या जागी निवड करण्याची प्रक्रिया सर्वसाधारण सभेत होणार होती. पाटील यांचीच निवड होणार असल्याचे सर्वश्रूत होते.
परंतु, कॉंग्रेसचे पुरंदरमधील सदस्य दत्ता झुरगे यांनी बुधवारी कृषी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला. सभापती सुजाता पवार यांनी तो तत्काळ मंजूरही केला. हे काही तासात घडले. गुरुवारी (दि.23) स्थायी समिती सदस्यपदासाठी झुरुंगे यांनी अर्ज भरला. त्याबाबत जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी झुरुंगे यांच्या नावाचे पत्र अध्यक्ष देवकाते यांच्याकडे दिले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने जगताप यांना अंकिता पाटील यांची निवड करावी, यासाठी पत्र दिले. मात्र, या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने निवड कोणाची करावी हा प्रश्न पडला. यात मोठी राजकीय खलबते झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची खेळी असल्याची चर्चा सभागृहात सुरू झाली.
इंदापूरविरुद्ध पुरंदर असे नाट्यमय चित्र…
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे नऊ सदस्य असून त्यापैकी सात सदस्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. मात्र, इंदापूरविरुद्ध पुरंदर असे नाट्यमय चित्र पाहायला मिळाले. तर भोर-वेल्हामधील कॉंग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे एकाच पक्षातील तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे चित्र दिसून आले. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्यांची कन्या अंकिता यांना स्थायी समिती सदस्य कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली. त्यामुळे ही सर्व खेळी झाल्याचे दिसून येते. सभागृहात दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले, मात्र माघार कोणीच घेत नसल्यामुळे गोंधळ उडाला.